The Looming Tower, फेब्रुवारी 2018 मध्ये प्रदर्शित झालेली मालिका, 50 मिनिट लांबीचे 10 भाग. थोडी काल्पनिक अशी 9/11 हल्ल्याच्या सत्य घटनेवर आधारित कथा, पण यात विशेषकरून हल्ल्याच्या आधीच्या घटना दाखविण्यात आल्या आहेत . “हा हल्ला रोखता आला असता?” मालिका बघताना मनात येणारा मुख्य प्रश्न.
ही मालिका सत्य घटनांवर आधारित असल्य्यामुुुळे, आपणास विचार करण्यास भाग पाडते की “यूएस मध्ये मानवतेवर झालेला सर्वात मोठा दहशतवादी हल्ला टाळणे शक्य होते, जर CIA ने योग्य वेळी कारवाई केली असती किंवा वेळेवर FBI ला साथ/माहिती दिली असती”. परंतु दोन्ही संघटनाच्या मतभेदा व हितसंबंधांचा संघर्षामुळे (कदाचित वैयक्तिक हित) ते एकमेकांशी भांडतात आणि माहिती एकमेकांपासुन लपवतात. ज्याचा परिणाम 9/11 सारख्या हल्ल्यात होतो.
जागतिक राजकारणावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही गोष्टींंकडे कसे दुर्लक्ष केले जाते हे पण मालिकेत दाखविले आहे. उदा. आखाती देशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सौदी राजघराण्याला देण्यात येणारी खास वागणूक किंवा सवलत.
नवनिर्वाचित अध्यक्षांच्या शपथविधिनंतर लगेच अधिकारी, सल्लागार देखील प्रक्रिये अथवा आदेशानुसार बदलल्या जातात. याचा परिणाम हळू निर्णय प्रक्रिया किंवा आवश्यक बाबींकडे दुर्लक्ष असा होतो.अल-क्यू बद्दल अंतर्गत सूत्रानी किंवा सुरक्षा संस्थानी दिलेला धोक्याचा इशारा अमेरिकन सरकारने गंभीरपणे घेतला नाही व अल-क्यू ला कमी लेखुन त्यांच्याकडे दुर्लक्ष केले.त्याचा परिणाम मोठ्या हल्लामध्ये झाला.मालिका बघत असतांना लक्षात येते की हा हल्ला दुर्लक्षित पणाचा परिणाम आहे.
हा हल्ला सुरक्षा संस्थानी कदाचित टाळला या असता,परंतु या अपयशानंतर दहशतवाद्यांनी कदाचित याहीपेक्षा मोठा हल्याचा कट आखला असता. सरतेशेवटी विनाशक वृत्ती, जिवीतहानी व मानवतेचा नाश हाच दहशतवाद्यांचा विचारांचा मूळ आधार व हेतू आहे.असे आतंकवादी हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा संस्थांना नेहमीच सतर्क,योजनाबद्ध आणि तत्पर असणे आवश्यक आहे, परंतु हल्लेखोरांना सुरक्षा संस्थांचे प्रयत्न धुळीस मिळवण्यासाठी फक्त एक संधी हवी असते.
कथेमध्ये, दाखविलेले घटना व प्रसंग (विशेषत: शेवटच्या भागातील) रोमांचक व धक्कादायक आहेत. लोक धर्माच्या नावाखाली कसे ब्रेन वॉश केले जातात, विशेषतः ब्रेन वॉश नंतर आतंकवादी काय व का करीत आहेत हे पण त्यांना कळू अथवा समजू दिल्या जात नाही. थोडक्यात, त्यांना धर्माच्या नावावर अंध व बुद्धीहीन बनविले जाते असे दाखविण्यात आले आहे.
जॉन ओ’निल (जेफ डॅनियल्स), अली सौफान (तहर रहीम), मार्टिन श्मिट (पीटर सरसगार्ड) आणि डियान मार्श (व्रेन स्मिट) यांनी अप्रतिम मुख्य भूमिका साकारली आहे. सोबतच सहकलाकारांनी पण उत्कृष्ट अभिनय केला.
चित्रांकन आणि दाखविलेले स्थान,घटना कथेला पुरक आणि योग्य आहेत.फेरतपासणी दरम्यान दाखवलेली दृश्य गूढ़ उघडणारे व नवीन माहिती देणारे आहेत. अल-क्यूला अशा हल्ल्यापासून रोखण्यासाठी सौफान आणि ओ’निल यांनी केलले सोज्वळप्रयत्न मालिकेत स्पष्टपणे दिसतात. दहशतवाद्यांंना अटक करुन त्यांच्यावर खटला चालवने, त्यांना दोषी व चुकीचे ठरवुन, त्यांना वॉर हिरो होण्यापासून रोखणे हे सौफान आणि ओ’निलचे मुुख्य लक्ष्य दाखिवले आहे. तर श्मिट दहशतवादांना जिवे मारण्यासाठी सैन्य कारवाईचा अवलंब करण्याच्या विचारांचा असतो.
मालिका 9/11 च्या कट रचनेच्या कथेसाठी, हल्ल्यापूर्वी अमेरिकेच्या संरक्षक संस्थांची स्थिती व कारवाई आणि धक्कादायक खुलासे यासाठी बघण्यासारखीच आहे.मालिका तत्त्व, शक्ती, पद, ताकद इ. च्या व्यक्तिगत शीत युद्धाचा उत्कृष्ट नमुना आहे.
