गुलाबो सीताबो, अमेज़न प्राइम वर प्रदर्शित झालेला २ तास लांबीचा चित्रपट. २-३ दृश्यांच्या पार्श्वभूमीत दिसलेल्या गुलाबो-सीताबो या बाहुल्यांच्या खेळाशिवाय चित्रपटाच्या शीर्षकाचा कथेशी काही संबंध नाही. फातिमा महल, मिर्झा-बेगम, मिर्झा के महल मे बांके बेहाल, बेगम और गुलाम, मिर्झा के बेगम पर अब्दुल फिदा, अड़ियल किरायेदार, पुराणी हवेली, मिर्झा-बेगम की प्रेमकहानी, तू-तू-मै-मै अथवा अशाच धाटणीच्या तुमच्या आवडीच्या अन्य कुठल्याही शीर्षकासह तुम्ही हा चित्रपट बघु शकता. ते शीर्षक गुलाबो सीताबो इतकेच कथेला अनुरुप असेल.
मिर्झा (अमिताभ बच्चन), बांके (आयुष्मान) आणि ग्यानेश शुक्ला (विजय राज) अशा सर्वोत्कृष्ट कलाकारांची मांदियाळी असलेला चित्रपट. या कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलणे म्हणजे सूर्याला प्रकाश दाखवण्यासारखे आहे. परंतु यांचा सोबतच क्रिस्तोफर क्लार्क (ब्रिजेंद्र कला), गुड्डो (सृष्टि श्रीवास्तव) आणि इतरांनी उत्कृष्ट अभिनय करून आपल्या भूमिकेस न्याय दिला आहे. फातिमा बेगम (फारुख जाफर) तिच्या मोजक्या ४-५ दृष्यांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडुन जाते, त्यांची भूमिका दर्शकांसाठी बोनस बंपर लॉटरीसारखी आहे.
चित्रपटाची कथा १००-१२० वर्ष जुन्या फातिमा महल या हवेलीवर आधारित आहे. हवेलीच्या मालकिन ९५ वर्षांच्या फातिमा बेगमचा नवरा मिर्झा; चिड़का, स्वार्थी, लोभी आणि हवेली स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी वेडा असतो. जुन्या म्हातारया घर मालका प्रमाणे तो नेहमी भाड़ेकरून सोबत भाडे, हवेलीचा देखभाल व दुरुस्ती खर्च, त्यांची रहन-सहन, वागणूक अशा विविध विषयावरून वाद घालताना दाखवला आहे. सर्व भाड़ेकरू हवेलीवर ताबा करून ठान मांडुन बसलेले असतात आणि दीडदमड़ी इतके घरभाडे देतात. बांके त्यामध्ये पण सर्वांत कमी घरभाडे देत असतो आणि खुप वर्षांपासून त्यानी घरभाड़े वाढवले पण नसते. ग्यानेश शुक्ला पुरातत्व विभागाचा एक अधिकारी जुन्या हवेलीला ऐतिहासिक वास्तु दाखवून, त्याला सरकारी मालमत्त्ता घोषित करत हवेलीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्नात असतो. त्यासाठी तो भाड़ेकरुंना नवीन घर देण्याचा मोह दाखवून त्यांना घर खाली करायला राजी करतो, हवेलीमध्ये वास्तव्य करने जीवाला घातक व धोकादायक आहे असे दाखवून मिर्झा व बेगम यांना बाहेर काढायचा विचारतो असतो. ख्रिस्तोफर क्लार्क हवेली मिर्झाच्या नावावर करून घेण्यास मदत करत असतो.
थोडक्यात कथा, फातिमा महल या जुन्या हवेलीच्या भोवती गुंफलेली मिर्झा-बांके-ग्यानेश यांची हवेलीसाठीची पळापळ दाखवणारीआहे.
अभिजात उच्च दर्जाचे अभिनेते अणि त्याच दर्जाचा दिग्दर्शक शुजित सरकार यांनी मनोरंजनाचे शिखर गाठण्याचा निस्वार्थ प्रयत्न केला आहे पण कथेचा पहाड़ त्यांना पार करता आला नाही.
मिर्झा-बांके मधील उंदीरमांजरीची तू-तू मी-मी कशी संपवली आहे, शेवटी हवेलीची मालकी कोणाला मिळते आणि सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी,विशेष मनोरंजन अणि विनोदाची अपेक्षा न करता हा सिनेमा बघु शकता. अध्ये-मध्ये एखादा विनोदी व मजेशीर प्रसंग आपल्याला हसवून थोड़ी उमेद देणारा ठरेल.
न बघण्याच ठरवले तरी आपण खुप मोठ मनोंरजन वगेरे काहीच गमावणार नाही अणि स्वत:चा वेळ वाचवणार ते वेगळ.
