पाऊस, मला पाऊस आवडायचे बरीच कारणे असले तरी मला पाऊस न आवडायच एकच मुख्य आणि मोठ कारण आहे. त्यामुळे माझं आणि पावसाच कधीच पटल नाही. ते कारण म्हणजे पावसानी, मला हवी तेव्हा कधीच साथ दिली नाही. बर माझ्या खूप अपेक्षा होत्या अस पण नाही. परंतु जर एखाद्यानी चांगल काम करायच किंवा भविष्य घडवायच ठरवलंच असेल, तर तो आमच्यासारख्याच का म्हणून ऐकणार!
सकाळी ५.३० ला आई आम्हाला उठवायची, डोळे उघडताच कळायच हे महाशय रात्री पासून बाहेर ठाण मांडून धो-धो करत आहेत. बाहेर धो धो करणारा पाऊस बघून आमच्याही मनाची नदी आनंदाने ओथंबून वाहायची. आज पाऊस काही थांबणार नाही वाटते! म्हणत आज शाळेला दांडी अस आईला सुचवणार तोच आई छत्री बाहेर काढून ठेवताना आणि अण्णा वही-पुस्तक वगैरे पॉलीथीन मध्ये टाकताना दिसायचे.ही सर्व जय्यत तयारी बघून मनातील आनंदाचा पूर थोडा कमी व्हायचा पण “उम्मीद पे दुनिया कायम है” म्हणत मनाला धीर धरायला सांगायचो. आई,अण्णा आणि छत्री जरी विरोधी पक्षात गेले असले, तरी पावसानी आपल्या सोबत पक्की युती केली आहे अस आभाळाकडे बघून मनात नक्की वाटायच. कारण शेवटी “येरे येरे पावसा” हे गाणे म्हणत त्याला येण्याची विनवणी करणारे आम्ही विद्यार्थीच होतो.
त्यामुळे चादरेमध्ये झोपून पावसाचा आस्वाद घेण्याचा कट जरी त्रिकुटाने अयशस्वी केला असला तरी आपला मित्र शाळेला दांडी बसवणारच अस मनात नक्की वाटायच.मन मारूनच झोपेतून उठत, पलंगावरून खाली उतरून प्रातःविधी निपटवायचो. हा महाशय बाहेर धो धो करत दोस्ती निभावत उभाच! मला एकदम जय-वीरूची मैत्री आठवायची. आनंदाच्या पुराला पुन्हा जोर चढायचा. शाळेला जायचचं नाही मनात पक्के असल्यामुळे तयारी का हा प्रश्न मनात उसळी घेत तोंडावाटे बाहेर पडायचा प्रयत्न करायचा, पण आई-अण्णाची धावपळ, चेहरा किंवा हातामधील बेलणे त्या प्रश्नाला मनातच बांध लावायचे. शाळेचे कपडे घालून,पाटी,पुस्तक,वही,दप्तर सर्व काही व्यवस्थित करून वेळेच्या ३० मिनिट आधीच तयार होऊन चहा-पाव खायला आई समोर हजर.चहा-पाव देण्याआधी आई हातात जेवणाचा डब्बा द्यायची. मनात आई बद्दल कीव यायची कि सकाळी उठून आपल्या साठी किती धावपळ करते आणि सोबत हे पण वाटायच की आज नसता केला डब्बा तरी चालल असतं, कारण आज पाऊस खुप आहे, शाळेला जाणंच शक्य नाही म्हणत “आनंदी-आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे” असे मनाचे श्लोक चालायचे. पाऊस महाशय जोर वाढवत होते. आता तर साफ दिसत होत कि पुढचे ३-४ घंटे काही हे महाशय सुट्टी घेणार नाहीत. मनातला पूर दुःखाची मरगळ सोबत घेऊन गेला असला तरी शाळेला दांडीचे शब्द बाहेर येई ना. डब्बा दप्तरात टाकला, दोस्त बाहेर संयमाने बरसतच होता आणि आई अण्णा तितक्याच संयमाने माझ्या दांडीच्या विचाराची दांडी उडवत होते. शेवटी आईने कपमध्ये चहा गाळला आणि पाव प्लेट मध्ये ठेऊन माझी शाळेला जाण्याची शेवटची घंटी वाजवली. ह्या बाबाचा बाहेर तांडव अजून पण जोरात सुरुच होता आणि हे बघून माझ्या मनात आनंदाच्या उकळ्या येत होत्या.
अशा पावसामध्ये गरम गरम चहाला कुणी अरसिकच नको म्हणेल. म्हणून पुढचं पुढे बघू हा विचार नक्की करत पावला नकार देत (घरीच थांबायच तर नाश्ता कशाला!, थोड्या वेळानी मस्त भजी करायला सांगू. या विचारांची होडी माझा मनातील पुरामध्ये संथपणे हिंदोळे घेत होती) चहाच्या कपाला त्याच्या अंतिम ध्येयापर्यंत पोहचवत आणि दांडी होणारच या कपोलकल्पनेत गरम गरम अमृततुल्याचा आस्वाद घेत विचार करत होतो, चहा संपला कि आपण आई-अण्णाच्या न्यायालयात पावसाविरोधातील छत्री असली तरी कपडे ओले होतात, ओले कपडे राहिले तर सर्दी होऊ शकते, चप्पल चिखलामध्ये फसून तुटू शकते, पुस्तक पण ओले होऊन फाटू शकतात, शाळेसमोर चिखल असतो त्यानी कपडे खराब होतात, शाळा गळते वगैरे आर्थिक, मानसिक, शारीरिक नुकसानीच्या दलील देऊन दांडीला स्वीकृत सुट्टीमध्ये बदलायच.
परंतु तो क्षण आला जेव्हा पावसाच्या आणि माझा वैरीची सुरुवात झाली. दररोज शाळेला जायच्या बरोबर ५ मिनिट आधी आणि मी अमृततुल्याचा एकच प्याला रिक्त करून खाली ठेवण्याआधी पाऊस महाशय आकाशात हळू हळू कुठे गडप झाले कळलं पण नाही आणि आभाळ अस मोकळ झाले जस की ५-६ दिवस पाऊस आलाच नाही आणि पुढे येणार पण नाही.
मित्रांनी, आपली शोले मधील जयसारखी साथ सोडली हे कळायला वेळ लागायचा नाही. पावला उगाच नकार दिला, याचा भार मनापेक्षा पोटावर जास्त घेत, दप्तराचे ओझे पाठीवर टाकत, दु:खी मनाला आधार म्हणून छत्रीची काठीकरून घराबाहेर पाऊल टाकत शाळेकडे कूच करायचो. अंगणातून एकवार अखेरची विनवणी करणारी नजर आभाळाकडे टाकत जड अंतःकरणानं शाळेला निघायचो. १५ मिनिटांची पदयात्रा १५ वर्षांची वाटायची. या १५ मिनिटांमध्ये विरहाचे आणि वाट बघण्याचे किती तरी गीत म्हणत विनवण्या चालायच्या. पण तो जय काही वीरुचं ऐकत नव्हता.
सरतेशेवटी शस्त्र आणि दांडीची अपेक्षा टाकून शाळेत प्रार्थनेवेळे आधी पोहचायचो. मन मारतच प्रार्थना व्हायची.प्रार्थना कमी आणि पावसाला शिव्यांची लाखोली जास्त वाहली जायची आणि सोबतच आता क्रिकेटचा सामना संपण्याआधी आला तर लक्षात ठेव अशी धमकी दिल्या जायची.(आमच्या डांबरी पिच आणि प्लास्टिक बॉलला पाऊसाचा काहीच फरक पडत नव्हता. आजूबाजुला साचलेल्या पाण्यामुळे क्षेत्ररक्षकाला पोहण्याचे धडे मिळायचे ते वेगळं)
पण प्रार्थना संपायच्या आधी पुन्हा आभाळात ढग दाटून यायचे. पुन्हा मनात आशेचा खूप छोटासाच पण अंकुर यायचा. प्रार्थना संपली तरी हा गैरहजरच, कधी नव्हे तो मी शिस्तीने रांगेत गोगलगाय पण लाजेल इतक्या हळू गतीनी वर्गाकडे निघायचो. परंतु पाऊस महाशय कृपा करतील तर खरं. ज्या गतीने मी वर्गाकडे निघायचो त्याच गतीने आभाळ काळवटने सुरु असायच. जणू मी वर्गात पोहचण्याचीच हा बरसण्यासाठी वाट बघत आहे.
मी वर्गाच्या दारात पोहचेपर्यंत सर्व शर्थीचे प्रयत्न आणि देवाचा धावा करून शस्त्र खाली टाकलेले असायचे. आता संपला सर्व खेळ अस म्हणत, शेवटी आभाळाकडे बघत पावसा बघून घेईल तुला असे डोळे दाखवण्यासाठी चेहरा बाहेर काढायचो तेच टपोरे थेंब माझ्या चेहऱ्याचे स्वागत करायला तयारच होते, मी डोळे दाखवण्या आधीच ते थेंब मला डोळे बंद करायला भाग पाडायचे. मग तर माझा रागाला पारावार नसायचा.
आता तर याला डोळे दाखवतोच म्हणत चेहरा बाहेर काढून बघणार, तर पाऊस महाशय माझ्याकडेच बघत मला वाकुल्या दाखवत “घेणं बाबू, मला ये रे ये रे पावसा म्हणत खोटा पैसा देतो न. आता बस दिवसभर शाळेत शिकत आणि तुझा क्रिकेटचा सामना पण मी वाहून नेतो बघच तू” असा म्हणत हसत आहे अस वाटायच. तेव्हा वाटायच की माझा आणि शोलेच्या वीरू दोघांचा ही घात खोट्या पैसानीच केला.फरक फक्त इतका होता की शोलेच्या जय नी एकच वेळ दगा दिला आणि मला पाऊस,नेहमीच जेव्हा जेव्हा मी दांडीचा विचार करायचो तेव्हा तेव्हा याप्रकारे दगा द्यायचा.रात्रभर आणि दिवसभर पाऊस, पण बरोबर शाळेला निघायचा वेळ झाला की या महाशयाची चहाची, जेवायची, सु-शीची विश्रांती नक्कीच व्हायची, त्यामुळे पावसामुळे शाळेला दांडी ही माझी एक कल्पनाच राहली. त्यामुळे बालपणी मनावर बिंबले गेलेले विचार लवकर जात नाहीत त्यात विशेषकरून जर पावसानी दांडी साठी सतत केलेला विरोध असेल तर बालमनावरील परिणाम बदलणे शक्यच नाही.म्हणूच सुरुवातीच्या काही अनुभवानंतरच आमची जय-वीरूची जोडी ठाकूर-गब्बर मध्ये रूपांतरित झाली. आणि ती अजूनही तशीच आहे (ठाकूर कोण आणि गब्बर कोण हा चर्चेचा विषय आहे!).
