Breathe (season 1) review – मराठी मध्ये समीक्षा

ब्रीद (सीजन १), एक गंभीर-भावनिक-गुन्हेगारी-नाटकीय शैलीची हिंदी वेब मालिका जानेवारी २०१८ मध्ये अमेझॉन प्राईम वर ३८ मिनिट लांबी असलेल्या ८ भागासह प्रदर्शित झाली आहे.

मालिकेची कथा दोन प्रमुख पात्रांवर आधारित आहे, पहिले पात्र वरिष्ठ निरीक्षक कबीर सावंत (अमित साध) कथेचा  मुख्यनायक, जो मद्यपी, भावनिक, चतुर, चाणाक्ष आणि थोडा हिंसक वृत्तीचा आहे. त्याने दुर्लक्षितपणा किंवा निष्काळजीपणामुळे एका दुर्घटनेत आपली लहान मुलगी गमावली आहे आणि त्या दुःखात उदास आयुष्य जगत आहे. सोबतच पत्नीशी तुटत असलेले नातेसंबंध वाचवण्यासाठी धडपडत आहे.दुसरे आणि सर्वात महत्त्वाचे पात्र म्हणजे खलनायक डेन्झील “डॅनी” मस्करेन्हास, आर माधवनने उत्कृष्टपणे निभावलेलं शांत, तरबेज, कुटील नकारात्मक पात्र. डॅनीचा ६ वर्षाचा मुलगा फुफ्फुसाच्या त्रासामुळे ६ महिन्यात मरणार असतो.

इतर मुख्य सहाय्यक भुमिकेत आहेत रिया गांगुली (सपना पब्बी) आणि श्रेया सावंत (रीत्वी जैन) कबीरची पत्नी आणि मुलगी, ज्युलियट मस्करेन्हास (नीना कुलकर्णी) डॅनीची आई, जोशुआ “जोश” मस्करेन्हास (अथर्व विश्वकर्मा) डॅनीचा बीमार मुलगा, प्रकाश कांबळे (हृषिकेश जोशी) कबीरचा सहाय्यक पोलीस अधिकारी, डॉ. अरुणा शर्मा (श्रीश्वरा) जोशची डॉक्टर आणि डॅनीची मैत्रीण/प्रेयसी, मालवणकर (श्रीकांत यादव) भ्रष्ट पोलिस निरीक्षक आणि कबीरचा प्रतिस्पर्धी, मार्गारेट मस्करेन्हास (उर्मिला कानिटकर) डॅनीची पत्नी, शैना (मधुरा नाईक) आणि रॉनी (तरुण गहलोत) डॅनीचे शेजारी, शंकर पाटील (काली प्रसाद मुखर्जी) कबीरचे वरिष्ठ अधिकारी, निलेश मोहिते (अजित भुरे) कबीरचे माजी वरिष्ठ अधिकारी, सुधीर वर्मा (ज्ञान प्रकाश), अनिता सहानी (जयश्री वेंकटरमनन), राजीव नायर (हियतेश सेजपाल) आणि राहुल प्रधान (चेतन चिटणीस) अवयव दाता म्हणुन नोंद केलेले लोक आणि डॅनीचे ४ बळी.अन्य छोट्या छोट्या सहाय्यक भूमिकांमध्ये इतर पात्र पण आहेत.

मालिकेतील सर्व पात्रांनी उत्तम काम केले आहे, पण आर माधवन मालिकेचा जीव की प्राण ठरला आहे. नेहमीप्रमाणे त्याने मुलाला वाचविण्यासाठी शांत डोक्यानी सुनियोजित प्रकारे लोकांचा खुन करणाऱ्या वडिलाचा उत्तम आणि विलक्षण अभिनय केला आहे.

मालिकेची सुरुवात सायरन वाजवत जाणारी एम्बुलेन्स आणि अनिता स्वतःच्या आत्महत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे अशी होते.तिच्या मृत्युनंतर कोणीतरी दार उघडे ठेवुन फ्लॅट मधुन बाहेर पडतो आणि कथा ४ महिने मागे जाते.

मालिकेची कथा पिता-पुत्राच्या भावनिक नात्याविषयी आहे. जोशला वाचवण्याकरिता योग्य दात्याचे फुफ्फुस प्रत्यारोपण करणे आवश्यक आहे आणि जोश प्राप्तकर्त्यांच्या यादी मध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. सरळ-साधा फुटबॉल प्रशिक्षक डॅनी, आपल्या ६ वर्षांचा मुलगा जोशला वाचविण्यासाठी सराईत गुन्हेगार ही लाजेल असा शांत डोक्याचा,चाणाक्ष खुनी बनतो. डॅनी नोंदणीकृत अवयव दात्यांच्या हत्येचा कट रचतो, जेणेकरून जोशला फुफ्फुस मिळेल आणि तो जगु शकेल. तो ५  दात्यांचा खुन करून त्याला नैसर्गिक मृत्यु किंवा अपघाताचे रूप देण्याची योजना केली असते.तो जेव्हा पहिल्या दात्याला (सुधीर वर्मा) मारायचा प्रयत्न करतो,तेव्हा त्याचा मृत्यु न होता, तो कोमामध्ये जातो.दुसर्‍या दात्याला (राहुल प्रधान) ठार मारून, अपघाती मृत्युचे रूप देतो. परंतु राहुलच्या मंगेतरचा विश्वास बसत नाही आणि तिला सर्व शंकास्पद वाटते म्हणुन यासंदर्भात ती कबीरकडे तक्रार करते.

मद्यपी पोलिस निरीक्षक कबीरला सुद्धा अवयव दात्यांचे होणारे मृत्यु संशयास्पद वाटतात. भविष्यात करणाऱ्या हत्येपासून डॅनीला रोखण्यासाठी, कबीर आपल्या मनाचे आणि अंतःप्रेरणेचे ऐकतो आणि त्या गोष्टीचा पिच्छा पुरवतो. हत्यांचा तपास करत असताना कबीरला कळते, त्याची पत्नी रिया पण नोंदणीकृत अवयव दाता आहे आणि डॅनी तिच्या पण हत्येची योजना आखत आहे. आपल्या बायकोला वाचवण्यासाठी कबीर ही बाब वैयक्तिकरित्या घेतो आणि नंतर सुरु होते कबीर आणि डॅनीचा पाठलागीचा खेळ.

डॅनी आणि जोशच्या नातेसंबंधाची ही अत्यंत भावनिक आणि हृदयस्पर्शी कथा आहे. जेव्हा डॅनीची प्रेयसी डॉ. अरुणा शर्मा, त्याला दात्यांना मारण्या पासुन रोखण्याचा प्रयत्न करते तेव्हा डॅनी तिची पण हत्या करतो. मालिका बघताना आपल्या बुद्धीला माहिती असते, डॅनी जोशला वाचवण्यासाठी जे काही करत आहे ते चुकीचे आणि अनैतिक आहे, परंतु भावनिक मन हे स्वीकारू देत नाही. डॅनी जे काही चुकीचे किंवा अनैतिक गोष्टी करत आहे, तो फक्त आपल्या ६ वर्षाच्या मुलाला जीवनदान देण्यासाठी करत आहे, अन्यथा तो एक चांगला व्यक्ती, साधा फुटबॉल प्रशिक्षक आणि चांगला पिता आहे, हे आपले मन बुद्धीला पटवुन देण्याची धडपड करत राहते. हेच भावनिक नाते मालिकेची ऊर्जास्तोत्र आहे. बर्‍याच दृश्यांमध्ये आपले डोळे पाणावले जातात.

नोंदणीकृत अवयव दात्यांची वर्गीकृत आणि गोपनीय यादी डॅनी कसा मिळवतो? डॅनी दात्यांच्या हत्येची योजना कशी आखतो? मारलेल्या व्यक्तीचा फक्त मेंदूच मृत होईल आणि इतर अवयव ६-७ तास सुरक्षित राहतील हे डॅनी कसे सुनिश्चित करतो ? यासाठी तो काय उपाय योजना करतो? मेंदू-मृत शरीर १ किंवा २ तासांत रुग्णालयामध्ये पोहचलेच पाहिजे हे डॅनी कसे सुनिश्चित करतो? डॅनी नैसर्गिक मृत्यू किंवा अपघात याचे चित्र कसे उभा करतो? जोशला फुफ्फुस सोबतच जीवन मिळते का ? कबीर रियाला वाचवतो का? डॅनी जोशला वाचवण्यात यशस्वी होतो का? कबीर डॅनीला रोखु शकतो का? कबीरला डॅनीविरूद्ध पुरावे मिळतात का? दात्यांचे नैसर्गिक दिसणारे मृत्यु ही हत्या आहे असे कबीरला का वाटते? याचा तपास करण्यासाठी कबीर का प्रवृत्त होतो? कबीरच्या मुलीचा मृत्यु कसा होतो? जोशला फुफुस्स आणि जीवन मिळण्यापूर्वीच डॅनी पकडला जातो का? डॅनीला कोण-कोण मदत करते ? डॉ. अरुणा डॅनीला मदत करते का? आणि अशा बर्‍याच प्रश्नांची उत्तरे ब्रीद सीजन १ च्या ८ भागांमध्ये दिली जातील.

आर माधवनने साकारलेली भावुक वडील आणि एक शांत डोक्याच्या खुन्याची नकारात्मक भुमिका,हे एकच कारण मालिका बघण्यासाठी पुरेसे आहे. बर्‍याच दृश्यांमध्ये आर माधवन, वडील या भुमिकेची आपल्याला दया येते किंवा त्याबद्दल वाईट वाटते.

मालिकेमधील काही दृश्य आणि पात्रांना विशेष महत्त्व नसल्यामुळे, वगळता आले असते. मालिकेचा शेवट थोडा नाट्यमय आणि अस्वीकार्य आहे पण शेवटी,ही एक काल्पनिक भावनिक गुन्हेगारी वरील मालिका आहे, म्हणून शेवट भावनांना आणि नियमांना लक्षात ठेवुन करण्यात आला आहे.

भावुक कथा, सुंदर अभिनय, डॅनी-कबीरची जुगलबंदी, वडील-मुलाचे नात्यातील जिव्हाळा इत्यादी अनेक कारणांसाठी अवश्य बघण्यासारखी ही मालिका आहे.उत्कृष्ट पात्र, अभिनयाने सजलेली एक भावनिक-गुन्हेगारीची कथा, ही बघणाऱ्याला मनोरंजनाची मेजवानी आहे.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

One thought on “Breathe (season 1) review – मराठी मध्ये समीक्षा

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started