
ब्रीद (सीजन २) -इन टु द शॅडोज, जुलै २०२० मध्ये अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेली गंभीर-भावनिक-मानसिक-गूढ-गुन्हेगारी-नाटकीय शैलीची कथा असलेली वेब मालिका. सरासरी ४०-४५ मिनिट लांबीचे आणि ५७ मिनिटांचा शेवटचा भाग असे एकूण १२ भाग, म्हणजे थोडेशी मोठी असलेली हिंदी वेब मालिका.
मालिकेमधील काही पात्रांव्यतिरिक्त ब्रीद सीझन १ शी याचा काहीही संबंध नाही, म्हणून जे का बदला, खुनी कौन, रावण, दशानन किंवा अशा कुठल्याही शीर्षकासह ही मालिका बघु शकता.
कथा मुख्यतः ४ प्रमुख पात्रांभोवती फिरते. पहिले पात्र सीजन १ मधीलच परंतु पूर्णपणे बदललेला इंस्पेक्टर कबीर सावंत (अमित साध) स्वभावाने चांगला, भावनिक, प्रेमळ,पिळदार देहयष्टीचा, मद्यपान न करणारा, उत्साही. सहा महिने तुरुंगवास भोगल्यानंतर मेघनाची काळजी घेण्यासाठी किंवा तिला मदत करण्यासाठी, विनंती करून स्वतःची बदली दिल्लीला करून घेतो.
सीजन २ चे पूर्णतः नवीन पात्रं, अविनाश सबरवाल (अभिषेक बच्चन) मनसोपचार तज्ज्ञ, श्रीमंत आणि कौटुंबिक पुरुष आणि त्याची पत्नी आभा (नित्या मेनन) व्यवसायाने शेफ आणि एका लहान मुलीची आई.
कथेचे चौथे मुख्य पात्र आणि खलनायक जे, मानसिक रूग्ण आणि सायको किलर (जर मालिका बघायचं ठरवले तर या पात्राबद्दलचे रहस्य ५ व्या भागात उलगडले जाईल, अन्यथा न बघता तुम्ही जास्त आनंदी रहाल)
अन्य मुख्य सहाय्यक भूमिके मध्ये आहेत सिया सबरवाल (इवाना कौर) अविनाशची मुलगी, सीजन १ मधील पात्र प्रकाश कांबळे (हृषीकेश जोशी), जयप्रकाश (श्रीकांत वर्मा) दिल्ली गुन्हे शाखेत कबीरचा सहाय्यक, झेबा रिझवी (श्रद्धा कौल) दिल्ली गुन्हे शाखेत कबीरची प्रतिस्पर्धी आणि स्वार्थी वरिष्ठ अधिकारी, शर्ले (सय्यामी खेर) कॉल गर्ल, मेघना वर्मा (प्लाबिता बोरथाकूर) अॅनिमेशन स्टुडिओमध्ये काम करणारी आणि जेव्हा कबीरने तिला बंदुकीच्या गोळीपासून वाचवण्यासाठी बाल्कनीतून ढकलले तेव्हा अपघातात दोन्ही पाय गमावलेली मुलगी, गायत्री मिश्रा (रेशम श्रीवर्धन) वैद्यकीय विद्यार्थीनी आणि सियाची काळजी घेण्यासाठी जे अपहरण करतो ती मुलगी, प्राचार्य कृष्णन मूर्ती (निझालगल रवी) अविनाश आणि जे च्या निवासी विद्यालयाचे प्राचार्य आणि जे चे पा, तेजिंदरसिंग (सुनील गुप्ता) कबीरचे बॉस, “तरुण” अविनाश (वारिन रूपानी), वृषाली (विभावरी देशपांडे) ढाबा मालक, प्रीतपालसिंग भरज (कुलजीत सिंग), नताशा गरेवाल (श्रुती बापना) आणि अंगद पंडित (पवन सिंग) जे चे लक्ष्य आणि अविनाश चे बळी. काही छोट्या छोट्या भूमिकामध्ये इतरही पात्र आहेत.
मेघना , नित्या आणि एबीचे काही सीन वगळता इतर सर्वांनी चांगले काम केले आहे. कबीर अभिनयात अविनाशपेक्षा वरचढ ठरला आहे.
एका जगरात्याच्या दृश्यानी कथेची सुरूवात होते जिथे गायत्री अभ्यास करत असते. परीक्षा आहे म्हणून ती एकटीच तिथून अभ्यास करायला घरी जात असते तेव्हा सुनसान रस्त्यावरून तिचे अपहरण होते.
न्यायालयामध्ये, ज्या मुलीने तिच्या काकाच्या पूर्ण कुटूंबाची हत्या केली आहे ती एकाधिक व्यक्तिमत्त्वाच्या विकाराची रुग्ण नाही हे डॉक्टर अविनाश तर्क देऊन सिद्ध करतो.अशा बर्याच प्रकारणामध्ये त्यानी पोलिसांना मदत केलेली असते.
अविनाश, एक आनंदी पारिवारिक व्यक्ती ज्याचा परिवार म्हणजे मुलगी सिया आणि पत्नी आभा आहे . सियाला मधुमेह असल्यामुळे तिला दर ४ तासांनी इंसुलिनचा डोस देणे आवश्यक असते. एका फार्महाऊसमध्ये आयोजित सियाच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीतून सियाचे अपहरण होते. सियाला शोधण्यासाठी अविनाश आणि आभा आकाश-पाताळ एक करतात परंतु तिच्याबद्दल त्यांना काहीच माहिती मिळत नाही.
अपहरणाच्या ९ महिन्यांनंतर अपहरणकर्ता जे, सियाला वाचवण्यासाठी अविनाश आणि आभाला प्रीतपालसिंगची हत्या करायला सांगतो.परंतु हत्या त्याच्यामधील “राग” ही भावना बाहेर काढून करणे आवश्यक असते सोबतच त्यांना ह्या हत्येचे चित्रीकरण करून विडिओ वृत्तवाहिनीला पाठवायला सांगतो. प्रीतपालसिंग नंतर, जे त्यांना नताशाची “वासना” ही भावना बाहेर काढून तिची हत्या करायला सांगतो आणि पुन्हा आधीसारखेच हत्येचे चित्रीकरण करून विडिओ वृत्तवाहिनीला पाठवायला सांगतो. नताशा नंतर, जे त्यांना अंगदची पण हत्या करायला सांगतो परंतु यावेळी भावना असते “भीती” आणि बाकी इतर गोष्टी आधीसारख्याच करायला सांगतो. अविनाश आणि आभा, सियाला वाचवण्यासाठी प्रीतपालसिंग, नताशा आणि अंगदची जे नी सांगितल्याप्रमाणेच राग, वासना आणि भीती ह्या भावना बाहेर काढून हत्या करतात. हत्याच्या पद्धतीबद्दल विचार केल्यावर अविनाशला असे लक्षात येते की व्यक्तीची विशिष्ट भावना बाहेर काढून मारण्याची पद्धत रावणाच्या दहा डोक्यांशी संबंधित आहे आणि प्रत्येक डोके एका वेगळ्या भावनेचे प्रतिक आहे. अपहरणकर्ता त्यांना रावणाच्या दहा डोक्यांशी संबंधित भावनांचा उपयोग एकामागून एक लक्ष्यांना ठार मारण्यासाठी करायला सांगत आहे.आणि हे असेच असेल तर अपहरणकर्ता सियाला वाचवण्यासाठी दहा जणांची हत्या करायला सांगेल. हत्या थांबवण्यासाठी अविनाश अपहरणकर्त्याने पाठवलेल्या व्हिडिओवरून काही पुरावा शोधण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला त्यातून काहीच मिळत नाही. अपहरणकर्त्याच्या अड्ड्यावर गायत्री सियाची चांगली काळजी घेते आणि त्या ठिकाणाहून २-३ वेळा सियाबरोबर पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न पण करते.
चित्रित करून प्रक्षेपित केल्या जात असलेल्या या क्रूर हत्यांच्या तपासाची जबाबदारी कबीर घेतो. सिया परत येण्यापूर्वी अटकेपासून सुरक्षित राहण्यासाठी अविनाश पण समायोजन करून या तपासात सामील होतो. कबीर हळू-हळू हत्या, अविनाश आणि जे यांच्यातील संबंध उलगडत नेतो आणि रहस्य उघडत जातो.
जे कोण असतो? जे ची भूमिका कोणी केली आहे? सियाचे अपहरण जे कसे करतो? ९ महिने मधुमेह असलेल्या सियाची काळजी जे कशी घेतो? जे ने सिया आणि गायत्रीचे अपहरण का केले? जे अविनाशला लोकांची हत्या करायला का सांगतो? या लोकांचा अविनाश किंवा जे बरोबर काय संबंध असतो? अविनाश सर्व हत्यांची योजना आणि अंमलबजावणी कशी करतो? जे चे एकूण किती लक्ष्य असतात? अविनाश इतर लोकांची हत्या करण्यापूर्वी कबीर सियाला सोडवू शकतो काय? अविनाश आणि आभाला रोखण्यात कबीर यशस्वी होतो का? मेघनाचे पुढे काय होते? कबीरशी तिचे काय संबंध असतात? जेपी आणि प्रकाश कबीरला कशी मदत करतात? या सर्वांमध्ये शर्लेची काय भूमिका आहे? या हत्यांमागे अविनाशचा हात असल्याचे कबीरला कसे कळते? या सर्व हत्या करण्यात आभा अविनाशला मदत करते का? ही सगळी गडबड कशी संपते? जे अविनाशचा रुग्ण असतो का? भिन्न-भिन्न भावनांचे हत्या किंवा अपहरण सोबत काय संबंध आहे? शेवटचा भाग शर्लेच्या हातात सी -१६ लिखित कागदाच्या तुकड्यासह संपतो,तर मग सी -१६ म्हणजे नेमके काय आहे? हे आणि अजून बरेच रहस्य मालिकेच्या १२ भागांमध्ये उलगडले जातात.
मालिकेमधील बरेच पात्र आणि दृश्य कथेशी असंबद्ध आहेत किंवा तर्कशुद्ध अथवा आवश्यक नाहीत, त्यामुळे मालिका लांब आणि कंटाळवाणी बनली आहे. दाखविण्यात आलेल्या बऱ्याच गोष्टी अतार्किक असल्यामुळे पचविणे अवघड आहे. कथेसोबतच निर्देशन, संपादन देखील मजबूत किंवा समर्पक नाही.
मालिकेचा शेवट शर्लेच्या हातातील सी-१६ लिखित अविनाशनी दिलेल्या कागदाच्या तुकड्यासह होतो. जे च्या आयुष्यासोबतच सी-१६ हे एक नवीन आणि न उलगडलेले रहस्यच राहते आणि मालिका संपते, याचा अर्थ आपण मालिकेच्या पुढील सीजनची वाट बघू शकता.
कथेमध्ये काहीच नावीन्य नाही,अशा धाटणीची कथा कदाचित आधी पण बघितली असू शकते. ५ व्या भागापर्यंत रुची,कुतुहूल, उत्साह आणि उत्सुकता वाढत जाते परंतु एकदा जे चे रहस्य उघडकीस आले की नंतर फक्त फ्लॅशबॅक, बदला, नियोजन, कथानक यांची जुळवाजुळवच आहे. त्यानंतर बघण्यात विशेष उत्सुकता राहत नाही. लांबलचक आणि हळू हळू पुढे सरकत जाणाऱ्या कथेची लय मध्ये मध्ये तुटते त्यामुळे कथा रटाळ आणि कंटाळणी वाटते.कथा आणि मालिका हवी तितकी भावनिक सुद्धा नाही. आपणाकडे ९-१० तासांचा फावला वेळ आहे आणि दुसरे काही मनोरंजक, रोमांचक पाहण्यासारखे नसल्यास आपण कबीरच्या अभिनयासाठी ही मालिका बघू शकता. अन्यथा मालिका टाळून वेळ वाचविण्याची अनेक कारणे मालिकेमध्ये आहेत.