स्वतंत्रता

illustration of Tricolor India background with Nation Hero and Freedom Fighter like Mahatma Gandhi, Bhagat Singh, Subhash Chandra Bose for Independence Day

स्वतंत्र भारतात जन्माला आलेले आपण, स्वातंत्र्याच्या सर्व मूलभूत मानवी हक्कांसह किंवा त्याहीपेक्षा जास्तच सुविधांसह जीवन व्यतीत करीत आहोत. लॉकडाउन लादल्या जाईपर्यंत “स्वातंत्र्य किंवा मुक्तता” या शब्दाला किंवा त्याच्या मूल्याला आयुष्यात फारच कमी महत्त्व होते (म्हणतात न माणसाला सहज आणि आयत्या मिळालेल्या वस्तूची किंमत नसते). परंतु जेव्हा सरकार द्वारा लॉकडाउन घोषित करण्यात आला किंवा लादण्यातच आला तेव्हा स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजण्यास खरोखरच खूप मदत झाली.

आपल्या कोणत्याही मूलभूत मानवाधिकारांना स्पर्श न करता अचानक सरकारने लॉकडाउन लादला होता किंवा लावला होता. सुरक्षिततेसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी बचाव म्हणून, जोपर्यंत गोष्टी सामान्य होत नाहीत किंवा प्रकोप थोडा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त घराच्या आतच रहावे लागणार होते. घरात रहावे लागलेले ते ३-४ महिने (तुरूंगात नाही किंवा कोणत्याही बंधनात नाही) गुलामी किंवा तुरूंगात असल्यासारखे वाटत होते, आपण निराशे कडे झुकत चाललो होतो,उदास झालो होतो, रागीट अथवा चिडके बनत चाललो होतो किंवा मानसिक रित्या कमजोर पडत चाललो होतो म्हणून आपण स्थिर मानसिक आरोग्यासाठी प्रेरक वक्ते, विनोदवीर, डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घेत होतो किंवा त्यांच्याशी संवाद साधत होतो. आणि हे सर्व तेव्हा घडत होते जेव्हा बरेच लोक घरूनच काम करत होते, टीव्ही, इंटरनेट, मोबाइल, दूरदर्शन, यूट्यूब, नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राइम यासारख्या मनोरंजनासाठी बर्‍याच गोष्टी उपलब्ध होत्या आणि मुख्य म्हणजे सोशल मीडियावर मनमोकळेपणाने विचार, विरोध व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य होते.याचा अर्थ असा की आपण घरी राहण्याच्या एका निर्बंधासह स्वतंत्र आणि मुक्त होतो आणि मुख्य गोष्ट की तो निर्बंध सुद्धा आपल्या स्वतःच्या सुरक्षितता आणि आरोग्यासाठीच होता.

लॉकडाउन चे सुरुवातीचे काही दिवस सहज सुरळीत निघून गेले परंतु जसे जसे दिवस जात होते तसे तसे खरेदीला, हॉटेलमध्ये, मॉलला, चित्रपट बघायला, पर्यटनासाठी जाऊ शकत नाहीत म्हणून आपण निराश, उदास, तणावग्रस्त, दु:खी झालो आणि सरकारवर चिडलो, रागावलो होतो. आपल्याला असे वाटू लागले की आपण गुलामगिरीतच आहोत, बंधनात अडकले आहोत म्हणून आपण बंधनमुक्तते किंवा स्वातंत्र्यासाठी ओरडण्यास,हल्ला करण्यास सुरवात केली.

लॉकडाउनमध्ये थोडी सूट मिळाल्यावर, ४ महिन्यांनंतर जेव्हा आम्ही कारमध्ये छोट्या ड्राईव्हसाठी बाहेर पडलो तेव्हा थोडं दूर गेल्यावर वाटले की आपण स्वतंत्र देशात श्वास घेत आहोत, पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यासारखे, गुलामगिरीच्या बेड्या तुटून आपण बंधनमुक्त झालो आहे असे वाटू लागले. तेव्हाची ती भावना किंवा मानसिक स्थिती खरोखरच शब्दांमध्ये मांडता येण्यासारखी नाही आणि त्या क्षणी मनात एकच विचार आला की हीच भावना म्हणजे स्वातंत्र्य आहे.  

त्या क्षणी मला समजले की चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, रामप्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान सारख्या अनेक वीरांनी जगण्याऐवजी स्वातंत्र्य किंवा आनंदाने मृत्यूला कवटाळणे का निवडले आणि ते देखील अगदी लहान वयात, काही स्वातंत्रवीर फक्त २३ वर्षांचे होते आणि काही तर त्यापेक्षा पण कमी वयाचे होते (२३ व्या वर्षी आपण काय करत होतो किंवा करत आहोत याचा तर विचार करायलाच नको). ५० वर्षांपेक्षा अधिक वयाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी ३६० किलोमीटर दांडीला पायी चालत का गेले, त्यांनी देशव्यापी असहकार आंदोलना कशासाठी पुकारले, त्यांनी अनेक वेळा सत्याग्रह किंवा उपोषण का केले,कुठलाही विचार न करता हसत हसत तुरुंगात का जात होते. ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे सुभाषचंद्र बोस ब्रिटिश साम्राज्याविरूद्ध सैन्य उभे करण्यासाठी अनेक अडचणी,त्रास सहन करत, संकटातून मार्ग काढत जर्मनी, जपान कशासाठी गेले. याव्यतिरिक्त लोकमान्य टिळक, विनायक सावरकर, लाला लाजपत राय, खुदीराम बोस, बटुकेश्वर दत्त, उधम सिंग, सरदार वल्लभ भाई पटेल, अनंत कान्हेरे, बलवंत फडके, अलूर सीतारामा राजू, हेमू कलानी,मातंगिनी हजरा, वांचीनाथन, कृष्णाजी गोपाळ कर्वे, बाघा जतिन, रोशन सिंग, प्रभावती देवी, प्रीतिलता वडेदार, जतींद्र नाथ दास, दुर्गावती देवी, भगवती चरण वोहरा, मदन लाल धिंग्रा, कुशल कोंवर, सूर्य सेन, अरुणा असफ अली यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची कधीही न संपणारी यादी ज्यांनी फक्त आणि फक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. कारण या लोकांनाच स्वातंत्र्याचा खरा अर्थ किंवा मूल्य माहित होते आणि ते सहजासहजी किंवा ताटात सजवून मिळणार नाही हे पण ते जाणून होते म्हणून गुलामगिरीत जगण्याऐवजी त्यांनी स्वातंत्र्यलढा लढत लढत हसत मृत्यूला आलिंगन देणे स्वीकारले. (जरा कल्पना करा की जर सरकारने लॉकडाऊनमध्ये विद्युत पुरवठा बंद केला असता आणि आपण टीव्ही, मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया इत्यादींचा वापरच करू शकलो नसतो, आपल्याला प्रश्न विचारण्याचा किंवा विरोध करायचा हक्कच नसता,विना चौकशी अटक हा नियम केला असता, वस्तूंच्या किंमतीत असंबंध वाढ केली असती किंवा भरघोस कर लादले असते तर आपली काय परिस्थिती झाली असती? गुलामगिरी म्हणजे नेमकं काय याची एक छोटीशी कल्पना)

जर आपण अगदी थोडेच बंधन असलेल्या ३-४ महिन्यांच्या लॉकडाउनमध्येच घाबरलो, निराश-दु:खी-उदास-मानसिकरीत्या तणावग्रस्त झालो, तर कल्पना करा की जर आपल्याला २० वर्षे (२०० वर्ष्याच्या ब्रिटिश शासनाचा तर विचार न केलेलाच बरा) अशा परिस्थिती, बंधनामध्येच ठेवण्यात आले असते तर आपली स्थिती काय झाली असती किंवा आपल्यासोबत काय घडले असते. म्हणूनच हे स्वातंत्र्य मौल्यवान आहे आणि त्याचा योग्य वापर करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच आहे. त्यामुळे देश, स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ज्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःचे जीवन अर्पण केले त्यांच्या मार्गाचा आणि तत्त्वांचा विचार न करता त्या सर्वांचे आभार मानणे आणि आदर करणे आवश्यक आहे आणि ते आपले कर्तव्य सुद्धा आहे.

आपण, स्वातंत्र्य सैनिकांच्या रक्ताने लाल झालेल्या दिवसाच्या सुट्टीचा आनंद निश्चितच घेऊ शकता कारण स्वतंत्र देशात स्वतंत्र नागरिकाला मिळालेला तो पण एक मूलभूत स्वतंत्र अधिकार-हक्क आहे. संपूर्ण दिवसाचा आपण गाणी ऐकून, चित्रपट बघून, विविध स्थळांना भेटी देऊन किंवा आपल्याला हव्या त्या मार्गाने आनंद घेऊ शकता, परंतु एक सुज्ञ आणि जबाबदार नागरिक म्हणून सुट्टीच्या दिवसातील किमान १५ मिनिट तरी देश आणि स्वातंत्र्यसैनिकांसाठी काही विधायक, सकारात्मक कार्य करायला समर्पित करण्याचा प्रयत्न करूच शकतो, विशेषत: स्वातंत्र्यलढ्यात जीव गमावलेल्यांसाठी जेणेकरून आपण स्वतंत्र भारतात मुक्तपणे श्वास घेऊ शकू आणि १५ ऑगस्ट स्वतंत्रता दिवस अभिमानाने साजरा करू शकू.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started