
बंदीश बॅंडिट्स, संगीतमय प्रेमकथा आणि घराण्यातील आपसी मतभेदामुळे संगीत घराण्याचा वारसाहक्क प्राप्त करण्यासाठी किंवा त्याचे प्रभुत्व मिळविण्यासाठी होणारी रोमांचक-नाटकीय प्रतिस्पर्धा असे कथानक असलेले एक हिंदी वेब सीरिज. भारतीय शास्त्रीय संगीताने पूर्णपणे भरलेले आणि सरासरी लांबी ३३ ते ५० मिनिटे असणारे १० भाग ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यामध्ये अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झाले आहेत.
मुख्य भूमिकेमध्ये आहे तमन्ना (श्रेया चौधरी) तरूण, सुंदर, चैतन्यपूर्ण, महत्वाकांक्षी लोकप्रिय पॉप गायक, प्रसिद्ध ऑनलाइन मीडिया तारिका, जी मैफिलीमध्ये तर सुंदर गाणे गाऊ शकते परंतु थेट प्रेक्षकांसमोर गाणे गायला घाबरते. तिचा जेपी या संगीत कंपनीबरोबरचा करार,तिचे जगातील प्रसिद्ध गायिका क्वीन एलीबरोबर गाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करेल, परंतु कंपनीला ३ यशस्वी गाणी देण्याचे आश्वासन ती पूर्ण करू शकत नसल्याने तिचा कंपनीबरोबरच करार धोक्यात आला आहे, तिच्या आईबरोबर तिचे वाद असतात आणि तिला आईकडून कुठलीही मदत घेणे आवडत नाही. आणि राधे (रीत्विक भौमिक) तरुण, उर्जावान, भारतीय शास्त्रीय गायक ज्याला गंडाबंधन करून पंडितजींचा वारस बनायची इच्छा आहे, संगीत सम्राट बनण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंडितजींकडून त्यांच्या घराण्यातील विविध गाणी,राग, संगीत शिकण्याची त्याची इच्छा असते.
सहाय्यक भूमिकेमध्ये आहेत पंडित राधेमोहन राठोड (नसीरुद्दीन शाह) एक महान भारतीय शास्त्रीय गायक जे बिकानेर घराण्याकडून संगीत शिकले आहेत, गेली पंचवीस वर्षे जोधपूरचे संगीत सम्राट, जोधपूरच्या महाराजाच्या विशेष सन्मानाचे मानकरी आहेत, त्यांनी बीकानेर घराण्याचे नाव बदलून राठोड घराना असे केले असते आणि सध्या आपल्या घराण्याचा वारस शोधत आहेत, जो त्यांचा वारसा, घराणे पुढे घेऊन जाणार आणि संगीताची सेवा करेल, भूतकाळात त्यांनी हेतुपरस्पर आणि स्वार्थापायी काही चुका केल्या असतात. दिग्विजय (अतुल कुलकर्णी) पंडितजींचा विद्यार्थी आणि एक उत्कृष्ट, महान गायक, त्यांच्याबद्दल अजून एक रहस्य मालिका बघून जाणून घेणच चांगले. मोहिनी (शीबा चड्ढा) राधेची आई आणि तिच्याबद्दलसुद्धा एक रहस्य जे मालिका बघून जाणून घेणेच चांगले. राजेंद्र (राजेश तैलंग) राधेचे वडील जे बॅंकेच्या कर्जात बुडालेले आहेत, गंडाबंधन झालेला पंडितजींचा विद्यार्थी आणि मुलगा. देवेंद्र (अमित मिस्त्री) पंडितजींचा छोटा मुलगा, राधेचा काका आणि सल्लागार, ज्याने परदेशी मुलीवर प्रेम केल्यामुळे संगीताचे शिक्षण थांबवावे लागले असे गंडाबंधन झालेले पंडितजींचा आणखी एक विद्यार्थी.अर्घ्या (कुणाल रॉय कपूर) जेपी कंपनीचा कर्मचारी आणि तमन्नाचा व्यवस्थापक, मित्र. कबीर (राहुल कुमार) राधेचा सर्वात चांगला आणि जवळचा मित्र, कार्यक्रम दिग्दर्शक जो जोधपुर मध्ये तमन्नाच्या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करतो आणि राधे-तमन्नाची भेट घडवून आणतो आणि वारंवार त्यांना मदत करतो. राजाजी (दिलीप शंकर) जोधपूरचा महाराजा आणि संगीत सम्राट स्पर्धा आयोजित करणारे पंडितजींचे चाहते. हर्षवर्धन (रितुराज सिंग) तमन्नाचे वडील. मुंशीजी (शशी किरण) महाराजांचा लेखापाल. अवंतिका (मेघना मलिक) तमन्नाची आई. रंधावा (संजय नाथ) जेपी म्युझिक कंपनीचे मालक. विकास यादव (अजय कुमार) बँक व्यवस्थापक. सूर्या (हर्ष सिंह) महाराजांचा भाऊ आणि राजेंद्रचा मित्र. संध्या (त्रिधा चौधरी) महाराजांची पुतणी,राधेची मंगेतर जी बेल्जियममध्ये आणि युट्यूबवरून भारतीय शास्त्रीय संगीत शिकली आहे, पंडितजींच्या संगीताची चाहती. गोपीनाथ (सुनील पुष्करणा) मोहिनीचे वडील. पडडू (प्रियंका आर्य) तमन्नाची चांगली मैत्रीण जिचा विवाह उदयपुरमध्ये होतो.
नसीरुद्दीन शाह आणि अतुल कुलकर्णी, दोन अभिनय क्षेत्रातील रत्न. कलाकारांच्या यादी मध्ये त्यांच्या नावाची एकत्र उपस्थिती हे एकच कारण वेब सीरीज पाहण्यासाठी पुरेसे आहे. विनोदी-भावनिक मित्र-प्रेम गुरू अशा विविध भूमिकांमध्ये कबीर आणि अर्घ्या यांनी छान काम केलं आहे, बाकी कलाकारांनी त्यांच्या भूमिकेस योग्य न्याय दिला आहे. काही दृश्यांमध्ये अभिनय नैसर्गिक वाटत नाही पण स्वीकारार्ह आहे. मुखवटा घातलेल्या माणसाचे दृश्य खूपच कृत्रिम,विनोदी, थोडे विचित्र वाटतात आणि कदाचित संगीत-नाटकीय शैलीच्या मालिकांमध्ये हा नवीन प्रयोग असेल.
मालिकेची सुरुवात जोधपूर मध्ये होते, जिथे पंडितजी सरस्वती माता आणि वीणेचे पूजन करून हवेलीमध्ये संगीत शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांचा वर्ग आणि रियाज घेत असतात. मुंबईमध्ये तमन्ना दुचाकीवरून जोधपूरसाठी निघते आणि अर्घ्या जेपी संगीत कंपनीबरोबर तिच्या करारावर चर्चा करत असतो.
तमन्ना पॉप-डिस्को गायक आणि राधे भारतीय शास्त्रीय गायक,या दोन वेगवेगळ्या शैलीच्या गायकांच्या प्रेमकथेने सुरु होणारी मालिका, हळू हळू शैली बदलत संगीत प्रतिस्पर्धा-संघर्ष-नाटक-रहस्य शैलीला प्रेमाची थोडी झालर असलेल्या कथेचे रूप घेत जाते. घराणे व कुटूंब इत्यादींवर प्रभुत्व किंवा वर्चस्व मिळवण्याच्या प्रतिस्पर्धेची आणि संघर्षाची ही कथा बनते. कथा हळूहळू उलगडत जाते की कसे एका माणसाच्या अहंकार आणि गर्वाने भूतकाळात आणि वर्तमानात कुटुंबात मतभेद आणि द्वेष निर्माण केला आहे. मालिकेचा पाया किंवा आधार असलेली कथा काही प्रमाणात सामान्यच आहे परंतु दाखविण्यात आलेले रहस्य आणि कथेमधील वळणे मनोरंजक आणि रोमांचक आहेत.
पंडितजींना व्यावसायिक गायन केलेले आवडत नाही कारण ते भारतीय शास्त्रीय संगीताचे भक्त, ज्ञानी आणि चाहते आहेत.त्यांच्या सर्वोत्कृष्ट आणि खास विद्यार्थ्यांला ते त्यांच्या घराण्यातील उत्तम आणि विशेष संगीत, राग शिकवतील, जो घराण्याचा वारस असेल आणि राठोड घराणा पुढे घेऊन जाणार. दिग्विजय, त्यांचा जुना व सर्वोत्कृष्ट विद्यार्थी पण व्यावसायिक गायन सुरू केल्यामुळे व इतर काही कारणांमुळे पंडितजींनी त्याला वर्ग व घरान्यामधून हाकलून दिले होते. आता तो एक श्रीमंत व्यक्ती आणि एका मोठ्या संगीत कंपनीचा मालक आहे. अनेक वर्षानंतर तो परत येतो आणि पंडितजींच्या राठोड घराण्यावर दावा सांगण्यासाठी संगीत सम्राट स्पर्धेचं आव्हान स्वीकारतो.
पंडितजींचा तेजस्वी,हुशार विद्यार्थी राधे गंडाबंधन आणि घरान्याचा विशेष विद्यार्थी होण्याची संधी गमावतो. देवेंद्रच्या सल्ल्यानंतर तो पंडितजींची शुध्दीकरण चाचणी देतो आणि त्यात उत्तीर्ण होऊन गंडाबंधनानंतर घराण्याचा विशेष विद्यार्थी होतो. राधेला वडिलावरील कर्जाबद्दल आणि हवेलीच्या लिलावाबद्दल माहिती मिळते म्हणून तो तमन्नाबरोबर भागीदारी करतो आणि मुखवटा घातलेला माणूस म्हणून गातो. तो भारतीय शास्त्रीय संगीत संलयन मध्ये गातो, या भागीदारी मुळे तो अल्पावधीतच संगीताच्या दुनियेत खळबळ माजवतो आणि भरपूर प्रसिद्धी मिळवतो. राजेंद्र आणि देवेंद्रच्या मदतीने राधे हवेली वाचवितो आणि बाकी सर्व कर्ज पण फेडतो परंतु पंडितजींना याविषयी काहीही माहिती नसते.
पंडितजी हळू हळू आपली श्रवणशक्ती गमावत असतात आणि पुढे गाऊ शकणार नाहीत, म्हणून ते संगीत सम्राट स्पर्धेमध्ये दिग्विजयच्या विरोधात गाण्यासाठी राधेची निवड करतात. परंतु जेव्हा पंडितजींना राधेच्या तमन्नाबरोबरच्या व्यावसायिक गायनाबद्दल माहित होते तेव्हा ते राधेला संगीत शिकवण्यास नकार देतात आणि मौन-व्रत धारण करतात. त्यानंतर पंडितजींचा अभिमान, प्रतिमा, कुटुंब आणि संगीत घराना इ. वाचवण्यासाठी विखुरलेले राठोड कुटुंब एकत्र येते.
तमन्ना-राधे एकमेकांवर प्रेम करतात आणि एकमेकांजवळ त्याचा स्वीकार पण करतात. पण राधेच्या इच्छेविरुध्द पंडितजी त्याचे लग्न संध्याबरोबर पक्के करतात. राधेला तमन्ना आवडते हे कळल्यानंतर सुद्धा संध्या हे लग्न रद्द करण्यास नकार देते, पण काही वळणानंतर ती स्वतःच हे लग्न मोडते.
कोणतीही संगीत-प्रेमकथा विरह, हृद्य तुटणे आणि प्रणया शिवाय पूर्ण होत नाही, तमन्ना राधेचा झगडा होते आणि त्यांच्या नात्यामध्ये दुरावा आणि कटुता निर्माण होते. संगीत सम्राटची स्पर्धा फक्त जोधपूर राज्यापुरती मर्यादित असते, पण राधेला लोकप्रियता आणि पाठबळ मिळावे म्हणून अर्घ्या स्पर्धा व्यावसायिक आणि मोठी करण्यास महाराजांना प्रवृत्त करतो. यासोबतच कथेत अनेक प्रेमकथा, प्रतिस्पर्धा आणि कुटूंबाचा मसाला भरला आहे.
मुख्य प्रश्न, पंडितजींचा उत्कृष्ट विद्यार्थी आणि प्रस्थापित गायक दिग्विजयला पराभूत करून राधे घराना वाचवू शकतो का? राधे आणि तमन्नाची भेट कशी होते? तमन्ना राधेशी ब्रेकअप का करते? राधे संध्याशी लग्न करण्यास का तयार होतो ? संध्या राधेसोबतच लग्न का मोडते? राजेंद्रवर प्रचंड कर्ज का होते? पंडितजींनी नकार दिल्यानंतर राधेला संगीत कोण शिकवते? एकदम दिग्विजय कुठून येतो आणि तो कोण असतो? श्रीमंत, प्रसिद्ध आणि यशस्वी गायक दिग्विजय घरानाच्या मालकी वर दावा का करतो? त्याला घराण्याचे नाव राठोडवरून बिकानेर का करायचे असते? क्वीन एलीबरोबर गाण्याचे तमन्नाचे स्वप्न पूर्ण होते का? क्वीन एली तमन्ना ऐवजी राधेची निवड का करते? तमन्नाची आई मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कळू न देता कशी मदत करते? तमन्नाच्या कराराचे जेपी कंपनी काय करते? राधे, व्यावसायिक गायन सुरू केल्यावर कुटुंबापासून स्वतःची ओळख कशी लपवतो? पंचवीस वर्षांपूर्वी संगीत सम्राट स्पर्ध्येमध्ये पंडितजीला कोणी हरवले असते? त्या विजेताचे पुढे काय होते? पंडितजी स्वतःचा अभिमान आणि संगीत सम्राट पदवी कसे परत मिळवतात? पंडितजी मौन व्रत का घेतात? मोहिनी प्रतिस्पर्धी दिग्विजयला वारंवार का भेटते? बंदिश बॅंडिट्स म्हणजे काय? त्याचे काय होते? शेवटचा प्रश्न तमन्ना आणि राधे पुन्हा एकत्र येतात का? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आणि अजून बराच मसाला,रहस्य, रोमांचक वळणे बंदिश बॅंडिट्सच्या १० एपिसोडमध्ये उघडकीस येतील.
ही एक उत्तम संगीत प्रेमकथा आहे, ज्यात कथा थोड्या हलक्या-फुलक्या रहस्यासह संगीत घराण्यावर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी होणाऱ्या संघर्ष, चढाओढीतून मिळणाऱ्या वळण व त्याभोवती फिरते. मालिकेचा शेवट एका रोमांचक वळणाने होतो त्यामुळे आपण शुद्ध संगीत प्रेमकहाणीने भरलेला किंवा संगीत प्रतिस्पर्धेच्या पुढील टप्प्यातील कथेसह मालिकेच्या पुढील हंगामाची अपेक्षा करू शकतो.
ही वेब मालिका बघण्यासाठी मालिकेतील भारतीय शास्त्रीय गीतासोबतच मधुर आणि मोहक संगीत हे एकच कारण पुरेसे आहे. पंडितजी, मोहिनी आणि दिग्विजय यांची उपस्थिती आणि त्यांचा दर्जेदार अभिनय हे चाहत्यांसाठी बोनस आहे. कबीर आणि अर्घ्या मध्ये मध्ये हसवत राहतात. संगीत घराण्यावर वर्चस्वाच्या संघर्षाला देण्यात आलेल्या एका चांगल्या प्रेमकथेचा तडका आणि मारधाडेचा दृश्य नसताना पण रोमांचक असणारी ही मालिका नक्कीच बघू शकता.संगीत प्रेमींसाठी तर ही संगीताची मेजवानीच आहे.
Very nice. Keep it up
LikeLike