धोनी………..अनमोल पलो का शायर (मराठी )

१९९६ ,वयाच्या ११ व्या वर्षी मी भारतीय क्रिकेट टीमच्या निळ्या जर्सीच्या प्रेमात पडलो. हा तो काळ जेव्हा मी क्रिकेटचा आणि विशेषत: भारतीय क्रिकेट टीमचा चाहता झालो. मी टीव्हीवर पाहिलेली पहिली मोठी स्पर्धा आणि आयुष्यातील पहिला सामना म्हणजे विल्स वर्ल्ड कप १९९६ मधील पाकिस्तान विरुद्धचा सामना, त्यात प्रसादनी सोहलच्या “कह के लुंगाच्या” दांड्या उडवल्या तेव्हा तर प्रेम दुप्पट झाले. माझ्या क्रिकेट प्रेमामागील खरे कारण म्हणजे माझे मोठे मावसभाऊ होते. त्यांनी मला क्रिकेटचे बरेच नियम शिकवले परंतु मी स्वनिरीक्षणावरून शिकलेला भारतीय क्रिकेटचा पहिला नियम म्हणजे मास्टर ब्लास्टर बाद झाल्यावर कुठलाही सकारात्मक विचार किंवा अपेक्षा डोक्यात न ठेवता टीव्ही बंद करायचा. खूपच वाटले तर फक्त १% आशेने, सामन्याचा निकाल विचारू शकता.

हा तो काळ होता जेव्हा भारतीय चाहत्यांना ९८% विश्वास होता की झिम्बाबे, बांग्लादेश, युएई, केनिया आणि अन्य कसोटी दर्जा नसलेल्या संघांविरुद्ध भारत निश्चितच सामना जिंकेल. तर पाक विरुद्धच्या सामन्यामध्ये ४०% विजयाचा आत्मविश्वास, ११०% अपेक्षा आणि १५०% देशभक्ती असायची. न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, वेस्टइंडीज विरुद्धच्या सामन्यांमध्ये ५०% विजयाचा आत्मविश्वास असायचा. तोच आत्त्मविश्वास दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यामध्ये २५-३०% तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आत्मविश्वास केवळ २-३% , २००% ईर्ष्या व पंचांना,ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अमाप शिव्या आणि दोष देण्याचा वेळ असायचा.

त्यावेळी अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना ऑस्ट्रेलियन संघ आणि खेळाडूबद्दल राग आणि मत्सर होता. ऑस्ट्रेलियाला हरताना बघायचे आणि या आनंदाचा साक्षीदार होण्यासाठी मी त्यांचे कुठल्याही संघाविरुद्ध असलेला सामना आशेने पाहत होतो. आणि त्या प्रत्येक सामन्यात मी ऑस्ट्रेलियाचा बाद झालेला खेळाडू आणि प्रतिस्पर्ध्यानी मारलेला चौकार-षटकारचा असा आनंद साजरा करीत होतो जसा मी त्या संघाचा प्रशिक्षकच आहे किंवा त्या संघावर मी कोट्यावधी रुपयांचा सट्टा लावला आहे. परंतु ऑस्ट्रेलिया संघ इतका संतुलित होता की त्यांचा पराभव बघायला मिळणे अवघड होते.

ऑस्ट्रेलियाच्या आक्रमक गोलंदाजीच्या ताकदीबद्दल आणि त्या तुलनेत भारतीय संघाच्या गोलंदाजीबद्दल बोलायलाच नको. पण प्रत्येक वेळी पराभवाच्या छायेत असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाची नाव विजयाच्या किनाऱ्यावर नेणारा एक महत्त्वाचा खेळाडू म्हणजे मायकेल बेव्हन,त्या वेळचा सर्वोत्तम सामना संपवणारा खेळाडू तर भारतीय संघामध्ये ही जबाबदारी होती अजय जडेजाच्या खांद्यावर. पण २२ यार्डच्या खेळपट्टीवर अजय जडेजा सामना संपवणाऱ्यापेक्षा एक उत्कृष्ट धडाकेबाज फलंदाजांचीच भूमिका जास्त योग्य निभावत होता. तो मायकेल बेव्हनच्या फलंदाजी सरासरी ५४ च्या जवळपास सुद्धा नव्हता. मला आठवतं की जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियासंघ फलंदाजीमुळे अडचणीमध्ये यायचा तेव्हा तेव्हा बेवन दत्त बनून त्यांना वाचवायला हजर असायचा, तो तळाच्या गोलंदाजांना सोबत घेऊन फक्त एकेरी-दुहेरी धाव घेत सामना जिंकून देत होता. म्हणून मला नेहमी वाटायचे की मायकेल बेव्हनने भारताचे राष्ट्रीयत्व तरी घ्यावे किंवा एखाद्या दुर्घटनेमध्ये तो जबर जखमी तरी व्हावा (होय,विध्वंसक का असेना पण हेच माझे विचार होते कारण भारतीय संघाच्या विजयासमोर काहीही महत्वाचे नव्हते) किंवा मवाळ उपाय म्हणून त्याने क्रिकेटमधून लवकरात लवकर निवृत्ती तरी घ्यावी.

परंतु देव,दैव आणि नशीब नेहमी ऑस्ट्रेलियाबरोबरच होते. बेव्हनला बाद करून रोखण्यास कोणालाही स्वारस्य नाही हा मला पक्का विश्वास झाला होता आणि वैयक्तिकरित्या मलासुद्धा बेव्हनचा काट सापडत नव्हता. त्यातच बेव्हनबरोबर खांद्याला खांदा लावून ऑस्ट्रेलियन संघाची ताकद वाढवून त्याची तटबंदी अजूनच भक्कम करायला यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅडम गिलख्रिस्टने संघात पदार्पण केले आणि लागोलाग तो पण विजयाचा शिल्पकार बनायला लागला. आणि आपल्याकडे होता नयन मोंगिया केवळ एक विशेषज्ञ यष्टीरक्षक आणि फलंदाजीमध्ये तो खेळपट्टीवरून येऊन त्याने गार्ड चिन्हांकित करताच भारतीय संघाच्या तळाच्या फलंदाजांना सुरुवात होत होती. एकदिवसीय सामन्यांमध्ये ८० पेक्षा जास्तच्या स्ट्राइक रेटने केलेल्या २० पेक्षा जास्त धावा प्रत्येक वेळी यष्टीरक्षक-फलंदाजांकडून झालेला एक नवा भारतीय विक्रम असायचा. त्याचे भारतीय क्रिकेट मधील सर्वात मोठे योगदान म्हणजे १९९८ मध्ये शारजा येथे मास्टर ब्लास्टरने केलेल्या सलग दोन वादळी खेळीपैकी एका खेळीच्या वेळी तो नॉनस्ट्राइकर होता आणि सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात काढलेल्या १५२ धावा. पण तो सामना फिक्सिंगमध्ये फसला आणि संघाबाहेर गेला, तेव्हापासून भारतीय संघ चांगली कामगिरी करत संघात स्थान निश्चित करणाऱ्या चांगल्या यष्टीरक्षकाचा शोध घेत राहिला,कि ज्याला वेळ आली तर फलंदाज म्हणून चेंडू कसा रोखायचा हे तरी माहित असेल (यष्टीरक्षक-फलंदाज मिळणे भारतीय संघाच्या नसीबात नसल्यामुळे,फक्त चांगल्या तज्ञ यष्टिरक्षकांनी पण संघ खुश राहत होतो) .१९९९-२००४ भारतीय संघाने इतक्या यष्टिरक्षकांना संधी दिली की प्रायोजक टी-शर्टवर नाव किंवा नंबर ऐवजी “यष्टीरक्षक” असेच छापत होते, जेणेकरून शेवटच्या क्षणी कुणीही त्याचा वापर करु शकेल.

सर्वच भारतीय यष्टीरक्षक गल्ली क्रिकेट मधील”सबको बॅटिंग मिलनी चाहिये” चा नियम काटेकोरपणे पाळत होते म्हणून त्यांना खेळपट्टीवर जास्त वेळ घालवणे आवडत नसल्यासारखे लवकरच बाद होऊन परत यायचे.परंतु मी नसीबवान होतो कारण २००१ साली वेस्ट इंडिज विरुद्ध स्पर्धेच्या अंतिम एकदिवसीय सामन्यात समीर दिघेची धुवांधार ९४ धावांची खेळी आणि २००२ साली अजय रात्राने कसोटी सामन्यात वेस्टइंडीज विरुद्धच ११२ धावा केल्या तेव्हा कसोटी क्रिकेटमध्ये परदेशी भूमीवर भारतीय यष्टिरक्षकाने पहिले शतक बनवण्याचा विक्रम झाला होता ह्या दोन्ही खेळीचा मी साक्षीदार झालो होतो. ह्या आनंदाने मला आणि भारतीय चाहत्यांना आकाश पण ठेंगणे पडले होते आणि आयुष्यात आता काहीच बघायचे शिल्लक राहिले नाही असे वाटायला लागले होते ( त्या काळात भारतीय यष्टिरक्षकाने खेळलेली एखादी कुठलीही महत्त्वपूर्ण खेळी मी विसरलो असल्यास क्षमस्व).

पार्थिव पटेल हा १६ वर्षांचा मुलगा या सर्वाला थोडा अपवाद होता. यष्टीरक्षणसोबतच फलंदाजीमध्ये सुद्धा तो चांगला होता. तरी पण भारतीय संघ द वॉल समोर येऊनच स्थिरावला आणि शेवटी द वॉलनेच विकेटच्या दोन्ही बाजूंना चेंडू रोखण्याची जबाबदारी स्वीकारली.ऑस्ट्रेलिया साठी गिली फलंदाजीमध्ये सलामीला येऊन गोलंदाजाची कारकीर्द खराब करत होता तर यष्टीच्या मागील त्याची चपळता आणि कामगिरीच्या जवळपास सुद्धा कुणी थांबू शकत नव्हतं (संगकारा विशेषज्ञ फलंदाज बनला होता आणि बाऊचर फलंदाजीत भरोसेमंद नव्हता). त्यावेळी गिलीच विश्व क्रिकेटमधील सर्वोत्तम यष्टीरक्षक-फलंदाज होता. त्यामुळे बेव्हनबद्दल जे काही भलं-बुर मी चित्तीत होतो, त्या यादीत आता गिलीचा पण समावेश झाला होता.

कर्णधारपद हे नेहमीच ऑस्ट्रेलियाची मजबूत बाजू किंवा ताकद होती, टेलर-वॉ-पॉन्टिंग-क्लार्क-स्मिथ, यांनी ऑस्ट्रेलियाची एकामागून एक मालिका जिंकत राहण्याची गाडी चालूच ठेवली, आणि का ठेवणार नाहीत? जेव्हा तुमच्या संघात यष्टीरक्षक-फलंदाज गिलि आणि सामना संपवूनच बाहेर येणार बेव्हन असतो तेव्हा विजय हा फक्त थोड्या वेळेचा प्रश्न असतो.

गिलीसारखा यष्टिरक्षक फलंदाज, बेवनसारखा सामना संपवणारा आणि स्टीव्ह वॉसारखा कर्णधार भारतीय संघाला मिळावा असे मी नेहमीच देवाला साकडे घालत होतो. हे तीन खेळाडू भारतीय क्रिकेट संघाला आणि चाहत्यांना निश्चितच जिंकण्याची सवय लावतील हे नक्की होते. भारतीय क्रिकेट संघाचे निवडकर्ते देखील ३ मुख्य आणि महत्वाचे खेळाडू, एक चांगला सामना संपवणारा, एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज आणि चांगला कर्णधार शोधत होतेच.

१९९९ कर्णधार म्हणून दादा आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या युवीने भारतीय चाहत्यांची सवय थोडी बदलून, आशा वाढवल्या होत्या पण संघ अद्यापहि सामना संपवणारा आणि चांगल्या यष्टीरक्षकची वाट पाहत होता आणि चाहत्यांचे हृदय तर “ये दिल मांगे मोर” चेच गाणे गात होते.

“आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे” हे सिद्ध करण्यासाठी धोनीने बांग्लादेशविरूद्ध पदार्पण केले. धोनी आणि यष्टीरक्षक-फलंदाजाच्या प्रतीक्षेत असलेल्या भारतीय चाहत्यांसाठी हे पदार्पण हृदयद्रावकच ठरले. धोनीने पहिल्या तीन सामन्यांत केवळ १९ धावाच केल्या आणि मला पार्थिव पटेलचे संघात पुनरागमन होण्याचे स्वप्न दिसायला लागले. पण भारतीय क्रिकेटच्या भविष्याच्या अंधारात धोनी नावाचा सोनेरी सूर्य काहीतरी महान घेऊन येणार होता.

आणि त्यानंतर आला पाक विरुद्धचा तो सामना जेव्हा धोनीने १२३ चेंडूमध्ये १४८ धावा फटकावून पाक गोलंदाजाना सळो की पळो करत त्यांचा धुव्वा उडवला .परंतु धोनीच्या फलंदाजी आणि यष्टिरक्षणाच्या तंत्रात बऱ्याच उणिवा आहेत असे तज्ञांना दिसले. परंतु जोपर्यंत खेळाडू संघासाठी सर्वोकृष्ट कामगिरी करतो आणि संघ जिंकत राहतो, तो पर्यंत भारतीय चाहते आणि मला तंत्राचा काहीच फरक पडत नाही (मांजेरकर, कांबळी अशा उत्तम तंत्राच्या खेळाडूंचे संघासाठीचे योगदान नेहमीच चर्चेचा विषय होता). धोनीने आपल्या धडाकेबाज फलंदाजीच्या आणि यष्टिरक्षणाच्या जोरावर प्रथम संघात आपले स्थान निश्चित केले, नंतर सामना-विजेता आणि सामना संपवणारा अशा विविध भूमिका साकारण्यासाठी हळू हळू त्याने आपल्या फलंदाजीची शैली आवश्यकतेनुसार बदलली.आणि एकदा जी त्याने कर्णधारपदाची सूत्रे हातात घेतली त्यानंतर तर भारतीय क्रिकेटचा चेहराच बदलला.

“नसीब नेहमी वीराला साथ देते” परंतु काही वर्षाच्या काळात एका धाडसी, जोखीम घ्यायला न भिणाऱ्या, शांत डोक आणि विचारसरणीच्या वीराने भारतीय क्रिकेटचे नशीबच बदलले. त्यांनी हे सर्व केले आपल्यातील सामना संपविण्याच्या,यष्ट्यामध्ये वेगवान धावण्याच्या, यष्टीच्या मागे जलद आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याच्या, संघासाठी कोणत्याही क्रमावर फलंदाजी करायला सज्ज, परिस्थिती आणि गरजेनुसार फलंदाजीची शैली बदलण्याच्या आणि मुख्य म्हणजे संघाला बळकट, एकत्र ठेवण्याच्या, भावनांमध्ये वाहून न जाता शांत मनाने नेतृत्व करण्याच्या आणि विरोधकांना नेहमीच धक्कादायक आश्चर्याने जाळ्यात पकडण्याच्या आपल्या क्षमतेने.

“शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकल्या जात नाही तोपर्यंत सामना संपला नाही” यावर खरोखर विश्वास आणि अंमल करणारा खेळाडू, मास्टर ब्लास्टर बाद झाल्यावरसुद्धा आपण विजय मिळवू शकतो या आशेने चाहत्यांना खुर्चीवर चिकटवून ठेवणारा खेळाडू, षटकारांसह सामना संपविणे छंद आणि आवड असणारा खेळाडू, कोणत्याही आणि कोणाच्याही चेंडूवर आपल्या ताकदीने सहज षटकार मारू शकणारा खेळाडू, क्रिकेट आणि त्यातील परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे माहित असणारा खेळाडू, २०११ विश्वचषक अंतिम सामन्यामध्ये लयमध्ये असणाऱ्या युवीच्या जागी पाचव्या स्थानावर आत्मविश्वासाने फलंदाजीला येण्याची जोखीम पत्करून इतिहास घडविणारा खेळाडू, २००७ मध्ये २०-२० विश्वचषक अंतिम सामन्यात भज्जीने शेवटचे षटक करायला नकार दिल्यावर शांत डोक्यानी जोगिंदर कडून अंतिम षटक करवून घेत विश्वचषक जिंकणारा एक तरुण, अनुभवहीन आणि निर्विवाद कर्णधार असा खेळाडू, विरोधी संघातील खेळाडूचे विचार आणि खेळ वाचण्याची क्षमता असणारा आणि त्यानुसार त्वरित योजना बनविणारा खेळाडू. कर्णधार ज्याने नवीन खेळाडूंना संधी देण्यावर, तरुण खेळाडूंवर, खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्यांना आत्मविश्वास दिला, पुरेशी संधी दिली. जगातील सर्वाधिक यष्टिचित करणारा यष्टीरक्षक, कारकिर्दीमध्ये एकूण १९५ यष्टिचित जे कि दुसऱ्या क्रमांकावर (१३९) असलेल्या यष्टिरक्षकापेक्षा ४०% नी जास्त आहे, हे सिद्ध करते कि तो स्टम्पच्या मागेसुद्धा किती वेगवान होता.

कोणाला तो आवडतो किंवा कोण त्याचा द्वेष करतो, संघातील इतर खेळाडूबद्दल त्याचा दृष्टीकोन कसा होता, त्यांच्यासोबत तो कसा वागला, जुन्या खेळाडूंबरोबर त्याने काय केले, व्यक्ती म्हणून तो कसा होता, त्यानी केव्हा निवृत्त झाले पाहिजे होते वगैरे वगैरे या सर्व गोष्टींचा भारतीय चाहत्यांना काहीच फरक पडत नाहीत. कारण चाहत्यांना सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भारताने आयसीसी विश्वचषक २०११ आणि २००७ आयसीसी २०-२० विश्व जिंकला, भारतीय संघ कसोटी आयसीसी रँकिंग मध्ये प्रथमच प्रथम क्रमांकावर आला, आयसीसी चॅम्पियन्स चषक जिंकला, ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध कॉमनवेल्थ बँक मालिका ३ मधून सर्वोत्तम अशा शैलीच्या अंतिम सामन्यामध्ये जिंकली आणि हि सर्व शिखरे भारताने गाठली जगातील सर्वोत्त्कृष्ट सामना संपविणारा, यष्टीरक्षक-फलंदाज आणि शांत चित्ताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात, ज्याने भारतीय क्रिकेट चाहत्यांना जिंकण्याची सवय लावली,ज्याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत सामना जिंकलेच हा आत्मविश्वास ३% वरून ८०% पर्यंत चढवला.

खास शैलीमध्ये सामना संपविणार्‍या धोनीने, आंतरराष्ट्रीय कारकीर्द मधून मात्र खुपच शांतपणे निवृत्ती पत्करली.

कुठल्याही वाईट घटनेमध्ये नेहमीच काहीतरी सकारात्मक बाब असतेच आणि धोनीच्या निवृत्तीमध्ये असलेली सकारात्मक गोष्ट म्हणजे आता बीसीसीआयकडे रवी शास्त्रीच्या जागी प्रशिक्षक म्हणून निवड करायला दोन सर्वोत्तम पर्याय आहेत. पहिला म्हणजे अर्थातच निर्विवाद “द वॉल” ज्याप्रकारे त्याने युवा क्रिकेट संघाचा खेळ आणि रंग बदलला त्यानंतर त्याला इतर कुठल्याही प्रकारे स्वतःची क्षमता सिद्ध करण्याची आवश्यकताच नाही आणि दुसरा व्यक्ती, ज्याला माहित आहे थोडे वयस्क, थकलेल्या, हरवलेल्या आणि कामगिरी खालावलेल्या खेळाडूंसह सुद्धा सामने कसे जिंकता येतात, असा महेंद्रसिंग धोनी. आयपीएलमध्ये चेन्नईसाठी तो नेहमीच वयस्क,इतर संघाद्वारे मुक्त व कामगिरी खालावलेले खेळाडू विकत घेतो (वॉटसन, बद्रीनाथ, मॅकुलम,मॉरीस,पियुष चावला,मोहित शर्मा,बालाजी, रायुडू, जाधव, ताहिर, भज्जी, ड्वेन स्मिथ, हेडन,अ‍ॅल्बी मॉर्केल याची काही उदाहरणे आहेत). परंतु सीएसकेचा पिवळा टी-शर्ट परिधान केल्या केल्या आणि धोनीने सारथी म्हणून संघांची धुरा हातात घेतल्या घेतल्या त्यांना कुठली ऊर्जा आणि लय प्राप्त होते हे देवालाच माहित कारण त्यानंतर ते इतके अपवादात्मक कामगिरी करतात कि ती कामगिरी कारकिर्दीमधली त्यांची सर्वोत्तम कामगिरी बनते. म्हणूनच “उम्मीद पे दुनिया कायम है” म्हणत आशा करूया आणि इच्छा ठेवूया की लवकरच आपल्याला धोनी एका नवीन भूमिकेत बघायला मिळेल, तोपर्यंत आयपीएल जिंदाबाद म्हणत त्याच्या खेळाचा आनंद घेत राहूच.

कर्णधार,खेळाडू आणि त्याच्या खेळासाठी काही ओळी, अंतिम पण शेवटच्या नाही
पल दो पल के शायरकी क्या खूब थी वो शायरी, जो अमर हुयी,
पल दो पल ही तेरी कहानी थी,लेकिन याद है जीती वो जंगे जो तूने है खूब लड़ी,
पल दो पल ही तेरी हस्ती थी, जो हर पल लोगो के दिल में है बसती,
पल दो पल ही तेरी जवानी थी,वो जवानी ही अब जवानो को दीवाना है करती………..

पल दो पल की ये अनमोल कहानी, जिसका नाम महेंद्रसिंह धोनी।

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

One thought on “धोनी………..अनमोल पलो का शायर (मराठी )

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started