भौकाल – Hindi web series review (Marathi)

भौकाल, एमएक्स प्लेयरवर मार्च २०२० मध्ये प्रदर्शित झालेली हिंदी वेब मालिका. सरासरी २७-४३ मिनिट लांबीच्या १० भागासहित पोलिस-गुन्हेगार-रोमांचक-नाटकीय शैलीची सत्य घटनांवर आधारित असलेल्या कथेची मालिका आहे.

मुख्य भूमिकेमध्ये आहे, नवनीत/नवीन सीकेरा (मोहित राणा). मुझफ्फरनगर, देशाची गुन्हेगारी आणि अपराधिक राजधानीला सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहण्यालायक आणि गुन्हेमुक्त स्थान बनवून, लोकांचा पोलिस व यंत्रणेवर विश्वास निर्माण करण्याच्या इच्छेने कार्यभार घेणारे पदोन्नती झालेले प्रामाणिक एसएसपी. पोलिसांनी आपल्या वडिलांना त्यांच्याच जमिनीसाठी दिलेला त्रास पाहून पोलिस यंत्रणेत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी  आयआयटी आणि आयएएस सोडून आयपीएस करणारा आज्ञाकारी पुत्र.

दुसऱ्या मुख्य पण नकारात्मक भूमिकेमध्ये शौकीन (अभिमन्यू सिंह), विधूर वडील ज्याचा मुलगा नेपाळमध्ये शिकत आहे. मुझफ्फरनगरमधील मुस्लिम वस्ती असलेल्या हुसेनपूरचा स्वयंघोषित राजा. क्रूर, हिंसक आणि निर्भय गुंड, जो पोलिसांना पण ठार मारण्याची भीती बाळगत नाही किंवा विचार करत नाही तर सामान्य लोकांची तर गोष्टच सोडा. त्याच्या परवानगीशिवाय कोणी हुसेनपुरात प्रवेश सुद्धा करू शकत नाही. अपहरण, खंडणी, हत्या हे त्याचे मुख्य व्यवसाय. त्याला स्थानिक खासदाराचे समर्थन किंवा फुस असते.

इतर मुख्य सहाय्यक भूमिकेमध्ये आहेत, चिंटू आणि पिंटू डेडा (सिद्धांत कपूर आणि प्रदीप नगर) डेडा गुंड टोळीचे म्होरक्या, जे शौकीन गुंडटोळीची प्रतिस्पर्धी आणि अर्ध्या मुझफ्फरनगरच्या बेकायदेशीर आणि अपराधिक कामाला जबाबदार आहेत. नाझनीन (बिदिता बेग) शौकीनची प्रेमिका आणि लेखापाल, जी त्याच्या अनुपस्थितीत धंदा सांभाळते. फारुख कुरेशी (सनी हिंदुजा) शौकीनचा खूप विश्वासू माणूस आणि वैयक्तिकरित्या शौकीनच्या खूप जवळचा माणूस, शौकीन ज्याला लहान भाऊ मानतो आणि ज्याच्या भावाला डेडा बंधू मारतात. पूजा सीकेरा (रश्मी राजपूत) नवीनची पत्नी. नेहा (गुलकी जोशी) नवीनची मित्र बनून त्याला मदत करण्याचा प्रयत्न करणारी मुझफ्फरनगर गुन्हेगारी बद्दल लिहणारी पत्रकार. बलराम यादव (फिरोज खुर्शीद खान) एसएसपीचे सहाय्यक आणि त्यांच्या खास पथकाचा एक भाग. इफ्तेकार / सलीम (रवी पांडे) एसएसपीचा पोलिस दलातील विश्वासू माणूस, जो गुप्तपणे वेष बदलून शौकीन टोळीत सामील होतो आणि जो शेवटी शौकीनला उचलून आणतो. विनोद शर्मा (अमित के सिंह) ऑनलाईन कॉल रेकॉर्डिंग आणि ट्रॅकिंग चे काम करणारा पोलिस दलात इलेक्ट्रॉनिक्सतज्ञ निरीक्षक आणि एसएसपीचा विश्वासू . करीम (सन्याम श्रीवास्तव) शौकीनचा माणूस. राजेश यादव (उपेन चौहान) एसएसपीच्या कुटुंबाशी वैयक्तिकरित्या जवळचा आणि लवकरच लग्न करण्याची योजना आखत असलेला एसएसपीचा विश्वासू ड्रायव्हर. मोरा कुमार (अभिषेकसिंग इर.). दयानंद सीकेरा (शहाब खान) नवीनचे वडील आणि सल्लागार. भाटी, खासदार इत्यादींसारखे काही महत्त्वाची भूमिका करणारे इतरही पात्र आहेत.

कथा सुरु होते फारुखचा भाऊ अब्बास दारूच्या नशेत डेडा भावाच्या जवळच्या माणसाला ठार मारुन पळ काढतो. दोन म्हातारे हे सर्व बघत भविष्यात होणाऱ्या घडामोडी आणि खूनखराब्याविषयी चर्चा करीत असतात. शौकीन फारुख आणि इतर लोकांसह खून झाला त्या जागेला भेट देतो.

दुसर्‍या शहरात नवीन सीकेरा आपल्या प्रयत्नांनी, हिम्मंत, प्रसंगसावधानतेनी आणि चलाखीने स्थानिक पोलिस ठाणे उध्वस्त आणि जाळपोळ करणाऱ्या जमावाला पांगवून पोलिस ठाणे आणि पोलिसांना वाचवतो. त्याच्या या शौर्यानंतर त्याला मुजफ्फरनगरचा एसएसपी म्हणून पदोन्नती मिळते.

डेडा आणि शौकीन टोळ्यां मुझफ्फरनगरवर बेकायदेशीरपणे आणि खुनखराब्यानी राज्य करीत असतात. त्यांच्या दहशती आणि हिंसाचारामुळे शहर पूर्णपणे धोक्यात, भीतीदायक वातावरणात आणि गुन्हेगारीच्या काळोखात असते.

शहरातील गुन्हेगारी विश्वाची रहस्ये जाणून घेण्यासाठी, सीकेरा पोस्टिंगच्या दोन दिवस आधीच आणि विशेषत: रात्री मुझफ्फरनगरला येतो. पदभार स्वीकारण्यापूर्वी, अब्बासची हत्या करण्यासाठी एका जवळच्या खेडेगावात डेडाबंधूने केलेल्या सामूहिक हत्याकांड आणि हिंसाचाराची बातमी त्याला मिळते.

सीकेरा एसएसपीचा पदभार स्वीकारताच शौकीन टोळीने केलेल्या अपहरणचा पहिलाचा खटला त्याच्याकडे येतो.चौकशीसाठी म्हणून तो हुसेनपूरला भेट द्यायला जातो. शौकीनला या गोष्टीचा खूप राग येतो, कारण याआधी कुठल्याही पोलिस अधिकाऱ्याने हुसेनपूरला कधीच भेट दिली नव्हती किंवा हिम्मंत सुध्दा केली नव्हती. चेतावणी संदेश सोबत धमकी म्हणून तो अपहरण केलेल्या माणसाला ठार मारतो आणि त्याचे शिर सीकेराला पाठवतो. त्यानतंर मात्र सीकेरा आणि शौकीन मध्ये थेट संघर्ष आणि चकमक सुरू होते.

शौकीनची शक्ती, दरारा आणि लोकांमधील भीती कमी करत असतांनाच, सीकेरा डेडा बंधूच्या जवळच्या लोकांना ठार मारत डेडा बंधूंची सुद्धा शक्ती, दरारा आणि भीती कमी करीत असतो. पिंटूला पकडण्याची चालून आलेली संधी, कुठल्यातरी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांनी पिंटूला दिलेल्या माहितीमुळे सीकेरा गमावतो. त्यानांतर मात्र सीकेरा सर्व काम काळजीपूर्वक करायला लागतो.

मालिकेची कथा सत्यघटनांवर आधारित आहे आणि मुख्यत: सीकेरा आणि शौकीन यांच्यातील संघर्ष आणि चढाओढीभोवती फिरते. डेडा बंधूं सहाय्यक भूमिकेसारखेच दाखविण्यात आले आहे. सीकेरा आणि त्याचे विश्वासू पोलिसांचे खास पथक, तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करून शौकीन आणि डेडाच्या जवळच्या व्यक्तींसह त्यांच्या अनेक लोकांना चकमकीत ठार मारतात. या दोन टोळ्यांशी झुंज आणि संघर्ष करतांना, सीकेरा सुध्दा आपले काही विश्वासू आणि जवळचे सहकारी सुद्धा गमावतो.

सीकेरा आणि त्याची खास पथक फारुखला अटक करतात. परंतु शौकीन जेव्हा न्यायालयातून पोलीसांना मारून फारुखला पळवून नेण्याचा योजनाबद्ध प्रयत्न करतो, त्यात फारूख पोलिसांच्या हातो ठार मारल्या जातो. फारुखच्या मृत्यूनंतर शौकीनला खूप राग येतो आणि तो पिसाळलेला हत्ती बनतो. त्यातच तो सीकेराला ठार मारण्याची शपथ घेतो आणि आर-पारच्या लढाईला सज्ज होतो. त्यानंतर कथा खूपच रोमांचक, थरारक आणि मनोरंजक बनते. यानंतर काय आणि कसे होते ते सकारात्मकरित्या समाप्त होणार्‍या वेब मालिकेमध्ये पाहणेच चांगले.

मालिकेची कथा ही नवीन चकचकीत वेष्टणामधील जुन्या वस्तूसारखीच आहे, म्हणून नवीन गूढ-रहस्य याची अपेक्षा करने चुकीचे ठरते. परंतु एकूणच बेचो, माचो नी भरलेल्या संवादाची थोडी हिंसक कथानक असलेली मालिका मनोरंजक, रोमांचक आणि थरारक बनली आहे. शौकीनने अभिनयात दमदार काम केले आहे आणि त्याला एसएसपीने तितकीच चांगली साथ दिली आहे. पण शेवटच्या भागात एसएसपी शौकीनला पूर्णपणे वरचढ झाला आहे. डेडा बंधू वगळता इतर लोकांनी सुध्दा चांगले काम केले आहे. डेडाबंधू गुंडांपेक्षा विनोदीच जास्त वाटतात.

नेहमीप्रमाणेच सत्यघटनांना चांगलेच मसालेदार बनवून दाखवण्यात आले आहे. काही दृश्यांमधील चित्रिकरण आणि संवाद सरळसाधे आणि नैसर्गिक वाटत नाही. परंतु अंतिम भागामधील रोमांच, उत्साह आणि थरारासाठी, शौकीन-सीकेराच्या अभिनय जुगलबंदीसाठी, आणि शेवटी दाखवण्यात आलेल्या थोड्या रहस्योदघाटनामुळे पुढील हंगामच्या अपेक्षेसह मालिका एक वेळ बघू शकता किंवा बघणे टाळले तरी काही नुकसान नाही.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started