कन्यारत्न….अष्टलक्ष्मी

आर्णा…आनंदाची चावी

Little Hands of our Ashtalakshmi Aarna

महाराष्ट्रामध्ये कन्येचा जन्म होतो, तेव्हा “अभिनंदन लक्ष्मी आली किंवा धनाची पेटी आली” म्हणत अभिनंदन केले जाते. तुझा जन्म होईपर्यंत मला वाटायचे, एखाद्या कन्येच्या वडिलांना तिच्या जन्मानंतर अचानक धनलाभ किंवा आर्थिक नफा झाल्यामुळे प्रचलित झालेला हा एक साधा वाक्प्रचार आहे.

पण तुझ्या जन्मानंतर, जेव्हा मी तुला पहिल्यांदा हातात घेतले आणि तुझे इवले-इवले हात-बोट, छोटे काळे डोळे आणि माझ्या तळहातापेक्षा पण लहान डोके बघितले, तेव्हा डोळ्यांतून निघालेल्या आनंदाश्रूंचा प्रत्येक थेंब खूप अनमोल आहे आणि त्या आठवणी इतक्या मौल्यवान आहेत की त्या आठवणींनीची आणि क्षणांची जागा दुसरं काहीच घेऊ शकत नाही. हे सर्व बघता, आपल्या घरी “संतान लक्ष्मी“च्या आशीर्वादाने “आदि लक्ष्मी” चे आगमन झाले आहे हे कळायला मला वेळ लागला नाही.

तुझं अन्नपदार्थावर खूप प्रेम, त्यात पण विशेषत: तू पदार्थांच्या चव, रंग आणि सादरीकरणाबद्दल थोडी जास्तच जागरूक आणि सतर्क असल्यामुळे, तु एकाच जागी बसून हसत-हसत लवकरात लवकर जेवण संपवावे म्हणून तुझ्याकरिता रुचकर आणि आरोग्यदायक आहार बनवण्याच्याच विचारात आम्ही मग्न असतो. तुझ्या जेवणातील पदार्थांवर केलेल्या चर्चा, संशोधन आणि प्रयत्नांनंतर, जेव्हा तू ताटामध्ये वाढलेले पूर्ण अन्न संपवून समाधानाने गोड हसते, तेव्हा आम्हाला पण पोट भरल्या सारखं वाटते ( तुझं पोट, वय, किंवा त्यापूर्वी काय आणि किती खाल्ले होते याकडे दुर्लक्ष करत आम्हाला योग्य वाटते तितके तुझ्या ताटात वाढतो आणि ते तू संपवावे हि अपेक्षा करतो). जेव्हा तू ताटामधले अन्न संपवते त्याक्षणी आम्हाला आकाश ठेंगणे पडते आणि सोबतच आपल्यावर “धान्य लक्ष्मी” ची कृपा झाली अशी भावना मनात येते.

तुझ्या मागे धावून आणि तुझ्या धाडसी कृती, खेळण्या किंवा शूर कृत्यापासून तुझा बचाव करता करता आम्ही थकून जातो परंतु तू तुझ्या स्मित, नृत्य, खट्याळ, गोंडस, मोहक आणि विविध “नौटंकी” ने आमची ऊर्जा आणि उत्साह परत मिळवून देऊन, दुप्पट जोमाने काम करायला प्रेरित करते. तूला हसतांना बघून आम्ही आमचा सर्व थकवा विसरून लगेच ताजेतवाने होतो, जणू “धैर्य लक्ष्मी” ने आम्हाला आशीर्वाद म्हणून वेदना आणि थकवा सहन करण्याची शक्ती आणि संयमच दिला आहे. झुला, पलंग, खुर्ची, जेवणाचा टेबल, सोफा, पायऱ्या, खेळण्यातील कार वर, बाहेर फिरायला जातांना वगैरे वयाच्या मानाने तु केलेले मोठे मोठे धाडसी कृत्य “वीर लक्ष्मी” आमच्याबरोबर राहत आहे याचीच जाणीव करून देत असतात.

तुझ्या आई-बाबा दोघांना पण प्राणी आवडत नाहीत, म्हणून ते नेहमी प्राण्यांपासून थोडं दूरच राहण्याच्या प्रयत्नात असतात. इतके असून सुद्धा कुठून तुझ्या मनात प्राण्यांबद्दल विशेष आपुलकी आणि प्रेमभाव उत्पन्न झाला देवच जाणे. त्यात पण कुत्रा आणि हत्ती तर तुझ्या विशेष प्रेमाचे धनी आहेत. जेव्हा पण तुला टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, खेळण्याचे दुकान किंवा इतर कोठेही प्राणी पाहण्याची संधी मिळते तेव्हा तुझ्या आनंद आणि उत्साहला भरती आली आहे हे तुझ्या वरच्या सुरातील आवाजातून लगेच दिसून येते. दिसणारा प्राणी चित्रात, खेळण्यात, टीव्ही मध्ये आहे की वास्तविक आहे याचा तूला काहीच फरक पडत नाही, प्रत्येक वेळी तुला सारखाच आनंद होतो . प्राण्यांवरील तुझे हे प्रेम बघून “गज लक्ष्मी” आमच्या अंगणात रांगते आहे याचाच आनंद आम्हाला होतो.

लहान खेळकर बाळ तू, आपल्या स्वत:च्याच ” उशीरा झोपणे, उशिरा उठण्याच्या ” नियमासह जगते. म्हणून तू लवकर झोपावे यासाठी आम्ही युद्ध पातळीचे सर्वच प्रयत्न करतो. जेणेकरून तू एकदा स्वप्नातील रंगेरी जगाकडे तुझा प्रवास सुरू केला की, आम्ही सुद्धा विश्रांती घेऊन दुसर्‍या दिवसाच्या कामांसाठी ताजेतवाने होवू शकु. अंगाईगीत, भजन, नृत्य, वाचन इत्यादी विविध पद्धतीने आम्ही तुला झोपवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु रोज रात्री आमच्या प्रयत्नांना व्यर्थ करण्याची दुप्पट ऊर्जा तुला कुठून मिळते देवच जाणे. तुला झोपवण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो, परंतु थकलेले आणि मानसिकरित्या झोपलेले आम्ही कसे तरी डोळे उघडे ठेवतो. आमची ही अशी स्थिती बघून कदाचित तुला आमच्याबद्दल कळवळा वाटतो म्हणून आमच्यावर दया दाखवत झोपी जाते आणि स्वप्नेरी दुनियेतील प्रवास सुरू करते. त्याक्षणी आम्हाला एकदम उत्साही आणि विजयी झाल्यासारखे वाटते. तेव्हा “विजय लक्ष्मी” चाच हात डोक्यावर आशीर्वाद देत आहे अशी भावना मनात येते.

तु उत्सुक, जिज्ञासू स्वभाव आणि वयामुळे प्रत्येक नवीन गोष्टीकडे बघितल्या बघितल्या “हे काय आहे? हे काय आहे?” विचारते. तुझ्या या सततच्या प्रश्नांनी कधीकधी आम्ही त्रासून जातो परंतु आमच्याकडे दुर्लक्ष करत तू आपल्या निर्दोष हसत मुखाने तोच प्रश्न विचारत राहते. बर्‍याचदा दाखवत असलेल्या गोष्टींबद्दल तुला आधीपासूनच माहिती असते तरीही सवयीप्रमाणे तू “हे काय आहे?” विचारतेच आणि चुकून त्याबद्दल भलतंच काही सांगितले तर आम्ही चूक सुधरवत नाही तोपर्यंत तू प्रश्नाचा भडीमार करत पिच्छा पुरवत राहते. एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुस्तकं तुझ्या खेळण्यांच्या यादीमध्ये शीर्षस्थानी आहेत आणि जणू देवानी आम्हाला दिलेली ही एक जादूची काडीच आहे, कारण तुला तासनतास शांत, हसत, खेळत, करमणुकीत मग्न ठेवण्यासाठी पुस्तकांपेक्षा दुसरा रामबाण उपाय नाही. विशेष म्हणजे जेव्हा तू अनियंत्रितपणे रडत असते तेव्हा पुस्तकच आमच्या मदतीला धावून येतात आणि तुझे लक्ष विचलित करून तुला शांत करतात. तुझे उत्सुक, जिज्ञासू असलेले मन आणि पुस्तकांबद्दल असलेले प्रेम बघता आम्ही “विद्या लक्ष्मी” चीच सेवा करतो असा विश्वास आम्हांला वाटतो.

फिरतांना, टीव्ही बघतांना दिसणारी प्रत्येक गोष्ट एकतर तुझी असते किंवा आमची तरी असतेच. तुझे हे बालमन आम्हाला बर्‍याच गोष्टींचे काल्पनिक का होईना पण मालक असण्याचा आनंद देऊन जाते, त्यातील बऱ्याच गोष्टी जोपासण्याचा तर आम्ही स्वप्नांमध्ये सुद्धा विचार करत नाही. तुझ्या बालमनाने आमच्या संपत्तीमध्ये जोडलेल्या गोष्टी आहेत – वाघ, जिराफ, हरण, हत्ती, शार्क, विमाने, ग्रह, आणि अजुन बरंच काही.

तू बोललेला प्रत्येक शब्द आम्हाला देवी स्वरस्वतीच्या शब्दांसारखाच मधुर वाटतो. “बाबा इक्के ये, कम (बाबा इकडे ये)”, आणा पल्ली (आर्ना पडली) ,बनानाआआआआ, चिक्क्क्कुउउउउ, आंबाआआआ, आई बाबूदाना दे (आई साबुदाणा दे), “आई अप्रीकाट दे, पिता दे (पिस्ता)” ,ओ दीदी (ओवी दीदी) आणि तुझ्या बडबडीतील प्रत्येक शब्द. हे सर्व बोलत असतांना तुझे हावभाव, उच्चार, स्वर, चंचलपना आमचा अमूल्य आठवणींचा साठा वाढवत असतात.

ऑफिसमधून घरी पोहचल्या पोहचल्या,मला अपेक्षित असलेली पहिली गोष्ट म्हणजे तुला हसतांना, बडबड करतांना किंवा नाचतांना बघणे, कारण तूला बघताच मला माझी निचरा झालेली ऊर्जा परत मिळते सोबतच आनंद आणि तणावातून मुक्तता मिळते आणि मला इतर कुणापेक्षाही आरोग्यदायी, ताजेतवाने असण्याचा आनंद देते.

लसीकरणानंतर किंवा इतर कुठल्याही कारणाने रडणारी तू जेव्हा शांत होते आणि हसते त्या क्षणी आमच्या जीवात जीव येतो आणि हरवलेला अनमोल खजिना परत मिळल्याचा आनंद आम्हांला मिळतो.

रोज तुझ्या किमान २ तास आधी आम्ही उठतो आणि कमी उमेद आणि उत्साहानेच नित्यनेमाची कामे करतो. तुला उठवायची आम्हाला इच्छा नसते परंतु जोपर्यंत तु उठत नाही आणि तुझा शब्द आम्ही ऐकत नाही, तोपर्यंत कुठलीही गोष्ट करण्यात आमचं मन लागत नाही. तुझा हसरा चेहरा बघण्यास आणि तुझ्या तोंडातून “मम्मा”, “आई”, किंवा क्वचितच एखाद्या दिवशी “बाबा” शब्द ऐकण्यास आम्ही आतुर असतो. हे शब्द आमच्या कानावर येताच, आमचे शरीर लगेच सक्रिय होते आणि उत्साहाने आणि जोमात आम्ही कामाला लागतो, जणू वर्षांपासून आतुरतेने वाट बघत असलेली गोष्टच आम्हांला मिळाली असते. हे आनंद आणि सुखांचे ऐश्वर्य तू रोज आम्हांला देत आहेस.

ह्या सर्व अमूल्य क्षणांची, आनंदाची, मौल्यवान आठवणींची आणि अनमोल, निख्खळ, निरागस हास्याची संपत्ती, दोन वर्षापूर्वी आमच्या घरी जन्म झालेली “धन लक्ष्मी” आमच्यावर रोजच बरसवत आहे.

आमच्यासाठी तर “अष्टलक्ष्मी” च “आर्णा” च्या रूपात आमच्या घरी आणि मनी आली आहे.

दिवसेंदिवस तू मोठी होत आहे आणि सोबतच आमच्या आयुष्यात रोज नवीन नवीन आनंद,मस्ती,आठवणी घेऊन येत आहे. आणि तीच आमची खरी संपत्ती आहे, ज्याची जागा आमच्या आयुष्यात दुसरं काहीही घेऊ शकत नाही. आज तू २ वर्षांची झाली, परंतु या २ वर्षातच तू आम्हाला तुझ्या मस्तीने,कृतीने, चातुर्याने, सामर्थ्याने, बोलण्याने, खळखळून हसण्याने,चेहऱ्यावरील भावाने, निष्पापपणाने, रडण्याने इतके श्रीमंत केले आहे की आता दुसऱ्या कशाचीच अपेक्षा नाही. मला वाटत की तू नेहमीच आमची खेळकर, गोंडस, हसरी लहान परीच रहावे, परंतु वडिलांच्या मनातील भावना या “वेळला” कशा कळणार?. वेळेची ही वास्तविकता स्वीकारून, तुझ्या द्वितीय वाढदिवशी तुला जगातील सर्वच आनंद, सुख, यश मिळावे हीच सदिच्छा आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

जीवेम शरद: शतम.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started