
“पॅलेस ऑफ इल्यूजन” किंवा “द्रौपदीचे महाभारत”, एका वेगळ्या परंतु मुख्य पात्राच्या दृष्टीकोनातून बघण्यात आलेली महाभारताची आकर्षक कहाणी म्हणजे हे पुस्तक. महाभारतातील मुख्य आणि महत्त्वपूर्ण पात्र पांचाली किंवा द्रौपदी किंवा क्रिष्णाच्या नजरेतून बघत नवीन लेखकाचा दृष्टिकोन या पुस्तकात वाचायला मिळते. “पॅलेस ऑफ इल्यूजन” हे शीर्षक पुस्तकाला उत्तम शोभले आहे कारण लेखकाने पांचालीच्या बालपण ते मृत्यूपर्यंतच्या संपूर्ण प्रवासात तिच्या “पॅलेस ऑफ इल्यूजन (भ्रमित करणारा वाडा)” यावरच लक्ष केंद्रित ठेवले आहे.
प्रसंग, पात्र, कथा बदलण्याची किंवा त्यासोबत थोडी सुद्धा छेडछाड करण्याची कुठलीही संधी नसताना, मुख्य कथेतील एका प्रमुख पात्राच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पुस्तक लिहिणे सोपे नाही. विशेषतः जेव्हा तुम्ही आजतागायत लिहण्यात आलेल्या प्रसिद्ध, महान, सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मोठ्या पौराणिक पुस्तकाच्या मुख्य पात्रांपैकी एकाच्या दृष्टिकोनातून कथा लिहायला घेता तेव्हा तर हे अजूनच अवघड होते. पण लेखक चित्रा बॅनर्जी दिवाकरुनीने ते अवघड खूप चांगल्या प्रकारे पार पाडले आहे आणि एक उत्तम पुस्तक वाचकांना भेट दिले आहे. थोडक्यात, (काल्पनिक किंवा सत्य?) पौराणिक कथा मूलाधार असलेले हे एक कल्पनांवर आधारित पुस्तक आहे.
पुस्तकामधील दोन गोष्टी थोड्या खटकल्या सारख्या होतात. पहिली, नगण्य अशीच म्हणजे दुर्योधनाची बहीण दुश्शाला, कौटुंबिक वंशावळीत दाखवण्यात आलेली नाही (महाभारतातील एका मुख्य स्त्री पात्राच्या दृष्टिकोनातून आणि एका स्त्रीनेच लिहिलेले हे पुस्तक असल्यामुळे हे थोडे अचंभित करते).
दुसरी गोष्ट म्हणजे कर्णाबद्दल द्रौपदीच्या मनात “स्वयंवरा” पासून (कदाचित छायाचित्र बघते तेव्हापासून) ते मृत्यूपर्यंत दाखवण्यात आलेले एकतर्फी प्रेम, काळजी, आकर्षण आणि आदर. विशेष म्हणजे तिच्या लग्नानंतर प्रत्येक महत्वाच्या घटनेमध्ये कर्णाचा उल्लेख अथवा तिच्या मनात त्याचाच विचार आहे असे चित्रित करण्यात आले आहे. या प्रेमाबद्दल उल्लेख केलेले हे पहिलेच पुस्तक आहे असे नाही. ते मान्य करणे किंवा न करणे हे पूर्णपणे वाचकांवर, त्यांच्या विचारांवर, त्यांच्या मानसिकतेवर आणि त्यांच्या मनातील कर्णाची प्रतिमा इत्यादीवर अवलंबून आहे. कर्ण फक्त कुंतीचा थोरला पुत्र आहे किंवा इतरही कुठल्या कारणांमुळे पांचालीचे त्याच्या प्रति प्रेम, काळजी आणि आकर्षण दर्शविणे आवश्यक नाही, विशेषतः महाभारताच्या मुख्य कहाणीच्या प्रवाह बाहेर जाऊन. पुस्तकामधील विविध प्रसंगामध्ये पांचालीचे कर्णा प्रतिचे प्रेम, काळजी, आकर्षण आणि आदर दर्शविण्यात आला आहे. शेवटी ही बाब किंवा वस्तुस्थिती दर्शविणे अथवा नाही हा प्रश्न पूर्णपणे लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार, लिहण्याची पद्धत आणि वाचकांची विचारसरणी, मानसिकता यांच्यातील जडणघडण यातील आहे.
स्त्रियांच्या स्वभावातील बर्याच लहान लहान गोष्टी,उदाहरणार्थ उत्सुकता, मत्सर, राग,शंका करणे, स्पर्धा करणे,आक्षेप घेणे, जुन्या (चुकीच्या ) परंपरांवर बोट उचलणे, विरोध करणे, स्वत: च्या लहान लहान गोष्टींबद्दल अभिमान, विविध गोष्टींची, दागदागिने, कपडे, घर सजवणे यांची आवड,सहनशक्ती, संयम,होणारी सक्ती, त्यांचे स्वभावगुण आणि इतरही बऱ्याच गोष्टी पुस्तकात विचार पूर्वक आणि खूप चांगल्या प्रकारे मांडण्यात आल्या आहेत, हेच पुस्तकाची जमेची बाजू आणि ताकद आहे. द्रौपदीची प्रशासनात, स्त्रियांच्या हक्क आणि प्रगतीसाठी घेतलेली भुमिका, घेतलेले पुढारीपण, वैचारिक जडणघडण या सोबतच अनेक ठिकाणी एक स्त्री म्हणून तिची होणारी हेटाळणी, असहायता, दुबळेपणा, होणारा असहकार, मिळणारी वागणूक, तिच्या मतांकडे करण्यात येणार दुर्लक्ष इत्यादी गोष्टीदेखील खूप चांगल्या पद्धतीने लिहण्यात आल्या आहे. द्रौपदीचे भाऊ द्रुष्टद्युमन, शिकंडी, धाय मा यांच्यावरील प्रेम, त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी, तिचे बालपण, शिक्षण, वडिलांच्या आयुष्यातील तिचे स्थान, तिच्या आयुष्यातील द्रुपदचे स्थान, तिच्या लग्नाच्या आधीच्या किंवा तिच्या वडिलांच्या राजवाड्यातील घटना अतिशय आकर्षकपणे दर्शविलेल्या आहेत. तिचे कुंतीशी असलेले संबंध सध्याच्या परिस्थिती मधील मुलगा-सासू-सुनेचे संबंध लक्षात ठेवूनच लिहिण्यात आले आहे, पांडवांचे जीवन, निर्णय स्वतःच्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी कुंतीबरोबर तिचे चालणारे शीत युद्ध, डावपेच, स्वतःच्या इच्छेनुसार,आवडीनुसार हवा तसा स्वतःचा सुंदर, आलिशान राजवाडा बांधायचा ध्यास खूपच चांगल्या प्रकारे वर्णविण्यात आला आहे.
महाभारत, त्यावर आधारित पुस्तके, कथा “श्रीकृष्ण” या महत्वाच्या पात्राशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. म्हणून श्रीकृष्णाचा द्रौपदीच्या जीवनात किंवा महाभारतातील भूमिकेविषयी वेगळा उल्लेख करण्याची गरजच नाही. श्रीकृष्णाच्या भूमिकेचे किंवा पात्राचे समर्पक आणि सुंदर वर्णन पुस्तकात केले आहे. या पुस्तकात मुख्यत: द्रौपदीच्या संबंधित किंवा तिच्या आयुष्याला, कथेला प्रभावित करणाऱ्या महाभारतातील घटनांवरच लक्ष केंद्रित केले आहे.
पांचाली, यज्ञातून जन्मलेली तेजस्वी कन्या. द्रोणाचार्याचे विद्यार्थी पांडवांविरूद्ध युद्धात पराभूत होऊन, युद्धबंदी बनल्यानंतर द्रुपद अपमानित आणि अस्वस्थ होतो. द्रोणाचार्यांची शक्ती आणि विद्या माहिती असल्यामुळे, द्रोणाचार्यांचा वध करून आपल्या झालेल्या अपमानाचा योग्य बदला घेणाऱ्या साहसी व समर्थ पुत्रासाठी द्रुपद यज्ञ करतो. यज्ञामधून, राजा द्रुपदला इच्छित मुलगा द्रुष्टद्युमन आणि अवांछित भेट द्रौपदीची विशेष भविष्यवाणीसह उत्पत्ती होते. द्रौपदीच्या जन्माच्यावेळी भविष्यवाणी होते की ही मुलगी इतिहासाचा मार्ग बदलण्यात खूप मोठी भूमिका निभावणार आहे. आणि द्रौपदीने इतिहास कसा बदलला किंवा त्यात तिची काय भूमिका होती याची कहाणी सर्वांना महाभारतातून माहितीच आहे तरी पण या मनोरंजक पुस्तकात वाचणे रोमांचक आणि कुतूहल निर्माण करणारे आहे.
पुस्तकामध्ये काही ओळी खूपच छान लिहिल्या आहेत. उदा. शिखंडी द्रौपदीला म्हणतो “(स्त्री) आपल्या सन्मानाचा बदला घेण्यासाठी एखाद्या पुरुषांची वाट बघेल आणि ती कायमच वाट बघत राहील “, किंवा द्रौपदीच्या शिक्षणा दरम्यानची ओळ “अपेक्षा मार्गातील लपलेल्या खड्यांसारख्या असतात – ते फक्त तुम्हाला ठेचाच देतात किंवा तुमच्याकडून चुकाच करवतात “
द्रौपदी आणि तिच्या “पॅलेस ऑफ इल्यूजन”(भ्रमित करणारा वाडा) जे द्यूत क्रीडा व युद्धानंतर सोडावे लागलेले तिचे पूर्ण झालेले एक स्वप्न होते आणि ज्यावर तिचे मृत्यूपर्यंत नितांत प्रेम होते, ह्या दोन गोष्टींसाठी हे पुस्तक अवश्य वाचण्यासारखे आहे.