Raktanchal (रक्तांचल) – Hindi Webseries Review in Marathi

रक्तांचल

रक्तांचल, मे २०२० मध्ये एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित झालेली आणखी एक सत्य घटनांवर आधारित वेब सीरिज. अपराध-हत्या-टोळीयुद्ध-राजनिती-हिंसा-रोमांचक असलेले सरासरी २५-३० मिनिट लांबीच्या ९ भागांची ही मालिका.  

मुख्य भूमिकेत – विजय सिंह (क्रांती प्रकाश झा), हुशार, उज्ज्वल विद्यार्थी, आयएएस बनायचे स्वप्न असणाऱ्या तरुणाच्या मुख्य भूमिकेत. डोळ्यादेखत वडिलांचा खून झाल्यावर बदला घेण्यासाठी बंदूक हातात घेतो. स्वतःची ताकद, वेष बदलून दिशाभूल करण्याची कला, तल्लख बुद्धी, हुशारी मुळे तो फारच कमी वेळात गुन्हेगारी आणि बेकायदेशीर जगात वर्चस्व प्रस्थापित करतो. वसीम खान (निकितिन धीर) सर्वच गुन्हेगारी आणि बेकायदेशीर गोष्टींवर वर्चस्व असणारा पूर्वांचलच्या गुन्हेगारी जगाचा ताकदवर गुंड, ज्याला स्थानिक आमदार पुजारीचा समर्थन प्राप्त आहे. वसीमच्या शक्ती आणि पैशाच्या जोरावर बांधकाम, रेल्वे, कोळशाचे सर्व मोठे सरकारी कंत्राट आमदार पुजारी स्वतः मिळवत असतो.

अन्य सहाय्यक भूमिकेत
सीमा (रोंजिनी चक्रबर्ती) डान्सर, कट्टाची प्रेयसी जी सनकीला प्रेमाच्या जाळ्यात अडकून विजयला मदत करते. बेचेनसिंग (चितरंजन त्रिपाठी) विजयचे काका आणि मार्गदर्शक. त्रिपुरारी (प्रमोद पाठक) विजयला तुरूंगात वसीमच्या लोकांपासून वाचवितो, साहिबसिंगच्या मदतीने त्याचा जामिनाची व्यवस्था करतो नंतर विजयचा विश्वासू सल्लागार बनतो. सनकी पांडे (विक्रम कोचर) कोळसा एजंट आणि वसीमचा उजवा हात. कट्टा (कृष्णा बिष्ट) विजयचा तरबेज नेमबाज. चून्नू (बासू सोनी) बेचनसिंगचा मुलगा आणि विजयचा विश्वासू ,जो त्रिपुरारीची हत्या होताना बघतो. साधू महाराज (राजेश दुबे) आध्यात्मिक गुरू आणि निवडणुकीमध्ये साहिबसिंगचे समर्थन करणारा राजकीय खेळाडू. रोली (सौंदर्या शर्मा) विजयची प्रेयसी. बडकी (प्राची प्रकाश कुर्णे) विजयची बहीण. फाझीला (फराह मलिक). बिंदू (केनिशा अवस्थी) साहिब सिंगचा प्रचार करणारी अभिनेत्री. बिलाल (शशी चतुर्वेदी) इरशादच्या मृत्यूनंतर वसीमचा विश्वासू माणूस. सुधा (प्रवीणा भागवत देशपांडे) विजयची आई. पुजारीसिंग (रवी खानविलकर) १०-१५ वर्षांपासून शहराचा आमदार,जो वसीमचे समर्थन करतो आणि शहरात गुन्हेगारी, बेकायदेशीर कारवाया चालवतो.साहबसिंग (दया शंकर पांडे) राजकीय नेता,आमदार,पुजारीचा प्रतिस्पर्धी, विजयला सहाय्य करणारा विशेष व्यक्ती, ज्याला विजय, पुजारी विरोधात बनारसच्या आमदारकीची जागा जिंकण्यास मदत करतो. इरशाद (भूपेशसिंग) वसीमच्या खास विश्वासातील व्यक्ती, जो त्याच्या कंत्राट आणि त्यासंबंधी व्यवसायाची देखभाल करतो सोबतच इतर अवैध कामकाज बघतो, विजयला बघणारा पहिला माणूस जो त्यानंतर विजयच्या कुटुंबावर हल्ला करतो.हिफाझत (सुशील कुमार श्रीवास्तव) वसीमचा माणूस जो त्याच्या अवैध शस्त्र व्यवसायावर लक्ष ठेवतो.वीरेंद्रसिंग (ज्ञान प्रकाश) विजयचे वडील, ग्रामस्थांसाठी झगडणारे तत्ववादी,सामाजिकदृष्ट्या सक्रिय व्यक्ती.

१९८०-९० च्या दशकातील पूर्वांचलमधील वाराणसी शहरावर आधारित ही कथा आहे. मुख्यतः विजय सिंग आणि वसीम या दोन टोळ्यांमधील शत्रुत्वाबद्दल आहे.

विजयचे वडील अवैध खाणकामवरील मजुरांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध लढा देण्यासाठी गेले असता वसीमचा गुंड विजयच्या समोरच त्यांची निर्घृण हत्या करतो. विजय आणि बेचन बदला घेण्यासाठी वसीमच्या गुंडाला ठार मारतात. त्यांना अटक होते आणि तुरूंगात पाठविले जाते. तुरूंगात विजयला त्रिपुरारी भेटतो. 

तुरुंगातमधून मुक्त झाल्यानंतर,विजय वेषांतर करून भूमिगत राहत स्वत:चे गुन्हेगारी साम्राज्य निर्माण करण्यासोबतच वसीमविरूद्ध लढायला लागतो.एक शासकीय कंत्राट मिळवताना विजय आणि इर्शादची चकमक होते. याचा सूड घेण्यासाठी इर्शाद विजयच्या बहिणीच्या गौनाच्या वेळी हल्ला करतो, या हल्ल्यामध्ये विजयची आई व मेहुणा गंभीर जखमी होतात. याचा बदला म्हणून विजय हिफाझतला ठार मारतो.

पुजारी आणि तत्वतः वसीमचा पराभव करवत विजय साहिबसिंगला निवडणूक जिंकवून आमदार बनवतो. वसीम जातीय दंगलीची योजना आखतो आणि साहिबसिंगला ठार मारतो, याच हल्ल्यात त्रिपुरारीचा हात तोडण्यात येतो. या घटनेनंतर संतप्त विजय इर्शादला ठार मारतो. इर्शाद मेल्यानंतर, सनकी वसीमचा विश्वासू आणि जवळचा व्यक्ती बनतो आणि वसीमच्या म्हणण्यावर विजयवर हल्ला करतो.या हल्ल्यातून सीमा आणि कट्टा विजयचा जीव वाचवतात. साहिब सिंगच्या हत्येनंतर वसीम पुन्हा पुजारीला आमदार बनवतो. विजयची ताकद कमी करण्यासाठी वसीम त्रिपुरारीला ठार मारतो.
विजय सीमाच्या मदतीने, सापळा रचुन सनकीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवते पण २-३ प्रयत्नात तो त्याला ठार मारण्यात अपयशी ठरतो.
योजना बनवून विजय पुजारीला ठार मारतो.

बाबा, एक अज्ञात पात्र विजयला एका शेतकर्‍याकडून जमीन रिकामी करण्याचा अवैध कंत्राट देतो. पण शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नाची माहिती मिळताच विजय आपले मत बदलतो आणि काहीही न करता त्याच्या घरातून बाहेर निघतो. याचा फायदा घेत वसीमचे लोक विजयची टोळी म्हणून शेतकर्‍याच्या घरावर हल्ला करतात आणि संपूर्ण कुटूंबासोबतच इतर लोकांची निर्घृण हत्या करतात. या सामूहिक हत्याकांडाला विजयच जबाबदार आहे समजून शासन त्याला सार्वजनिक शत्रू घोषित करते आणि त्याला बघताच गोळी घालून ठार मारण्याची आज्ञा देते.

वसीम भेटीसाठी विजयला बोलवतो. भेटीदरम्यान दोन टोळ्यांमधील गोळीबारात वसीम आणि विजय गंभीर जखमी होतात. जखमी विजय नदीत कोसळतो आणि वाहून जातो, त्याच्या घरी त्याच्या मृत्यू मुळे शोककळा पसरते आणि कुटुंबीय आक्रोश करतात. विजय आणि टोळीला ठार मारण्यात सनकी चुकतो आणि जखमी वसीमला सांगायला परत येतो. मालिका एका मोठ्या वळणावर संपते त्यामुळे दुसर्‍या हंगामाची वाट नक्कीच बघू शकता.

सत्यघटनांवर आधारित आणि हिंसाचारांनी भरलेल्या या सीरिजला “रक्तांचल” हे शीर्षक समर्पक आहे. काही दृश्य किंवा घटना व्यवस्थेवर खरोखरच प्रश्न उपस्थित करतात.सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. जर आपण “गँग्स ऑफ वासेपुर” चे चाहते असाल, तर त्याच दर्जाचा अभिनय आणि हिंसाचार असलेली ही सिरीज तुम्हाला नक्कीच आवडेल. अन्यथा बघणे टाळून अपराध, टोळीयुद्ध, गुन्हेगारी जगाची निंदा न करता आपले मन ताजे, शांत, आणि सकारात्मक ठेवून प्रसन्न राहू शकता.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started