
मार्शल गोल्डस्मिथ, मुख्यतः व्यवस्थापन कार्यसंघ, उच्च व्यवस्थापनातील लोक, भविष्यातील नेते, विद्यमान नेते यांच्या नेतृत्व विकास कार्यक्रमांचे प्रशिक्षक म्हणून काम करणारे एक उत्तम जीवन प्रशिक्षक आणि तितकेच उत्तम शिक्षक यांनी लिहिलेले हे पुस्तक. त्यांंच्या पक्षकारचे यश, अपयश आणि कार्यक्रम अपूर्ण सोडणारे असे काही उदाहरणे पुस्तकात कारणासह नमूद केलेली आहेत सोबतच संबंधित कथा, तंत्रे, प्रेरणा, प्रयत्न, इच्छित बदल, विकास इत्यादींचा उल्लेखही आहे.
आपली वागणूक, व्यवहार किंवा वर्तन यावर मुख्यतः दोन गोष्टींचा परिणाम होतो: Environment (सभोवताली असलेले लोक, परिस्थिती, वातावरण इ.) आणि Trigger (आपल्याला क्रिया/प्रतिक्रिया करायला प्रवृत्त करणारी भावना).वेगवेगळ्या परिस्थितीत मानवी वर्तनाचे आणि प्रतिक्रियाचे स्पष्टीकरण देण्यासाठी या दोन संज्ञांंची पुस्तकात बरेच वेळा वेगवेगळ्या संदर्भात पुनरावृत्ती झालेली आढळते. Environment ही मुख्य गोष्ट आहे जी विशिष्ट परिस्थितीत मानवी वर्तन / प्रतिक्रिया नियंत्रित करते. एकाच परिस्थितीवर वेगवेगळ्या Environment मध्ये लोकांच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात आणि Trigger व्यक्तीला चांगली किंवा वाईट क्रिया/प्रतिक्रिया करण्यास प्रेरित करते. Trigger प्रेरणा किंवा परिणाम ची भुमिका करते ज्यामुळे व्यक्ती कार्य करतात किंवा करायला प्रवृत्त होतात.
पुस्तक लिहतांना ज्या मुद्दावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले आहे ते म्हणजे व्यक्तीची वर्तणुक, वर्तणुक सुधारणे व व्यक्तीच्या प्रगती, विकासावर जेणेकरून व्यक्तीला स्थिर आणि प्रगतशील व्यावसायिक तसेच वैयक्तिक जीवन व्यतीत करायला मदत मिळेल. पुस्तकात नमूद केलेले उपाय/तंत्रे लोकांना व्यावसायिक जीवन विकसित, गतीमान, प्रगत करायला किंवा वैयक्तिक जीवनात संतुलन साधण्यास मदत करेल किंवा मार्गदर्शक बनेल. पुस्तकामध्ये काही योग्य, मनोरंजक, चित्तवेधक आणि संबंधित उदाहरणांचा उल्लेखही आहे.
पुस्तकाचा मुख्य विषय भविष्यातील किंवा विद्यमान पुढारी/मार्गदर्शक/अग्रणी (विशेषतः कंपनी किंवा संस्थामधील) यांच्या विकासावर किंवा त्यांच्या उणीवा दुर करुन त्यांना विशिष्ठ पदाकरिता अनुरुप बनवणे आहे (परंतु कोणीही पुस्तकात सांगितलेली तंत्रे स्वतःच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी वापरु शकतो). पुढाऱ्यांनी शांत आणि संयमी कसे राहावे, स्वतःवर नियंत्रण ठेवून वातावरणाप्रमाणे कसे वागावे, स्वयं-विकासाचे विविध तंत्र व अशाच प्रकारच्या तंत्राचा विषय पुस्तकात हाताळला आहे.
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुस्तकामध्ये सांगितलेले उपाय/पद्धती/तंत्र, खुप जास्त प्रयत्न न करता सहजासहजी अंमलात आणणे शक्य आहे. दिलेली उदाहरणे सहज समजणारी, पुरक आणि सोपी आहेत. पुस्तकात स्वतःला/इतरांना विचारायच्या प्रश्नांच्या प्रकारांचा; अधिक योजनाबद्ध पद्धतीने कसे काम करावे आणि त्याचे फायदे; स्वत: मधून उत्तम कसे मिळवावे; संभाषण व इतरही अशाच काही मुददांंचा समावेश केला आहे. जे व्यक्तीला लाभकारी ठरु शकतात.
पुस्तकामध्ये सांगितलेले सर्व उपाय किंवा तंंत्राची अंमलबजावणी करणे कदाचित अवघड आहे. परंतु कमीतकमी एक तंत्र तरी आत्मसात करुन त्याची अंबलबजावणी करत वर्तनात बदल करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि यामुळे नक्कीच लाभ होईल (स्वानुभवावरुन).
वैयक्तिक किंवा व्यावसायिक प्रगतीसाठी, स्वत:च्या विकासासाठी, व्यावसायिक वृद्धीसाठी, नातेसंबंध सुधारण्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे ( वेगवेगळ्या कंपनी द्वारे देण्यात येणारे ४-५ व्यावसायिक प्रशिक्षण या एकाच पुस्तकामध्ये समाविष्ट आहे).आवश्यक, योग्य, पुरक ते तुम्ही यातून घेऊ शकता.जर हे सकारात्मकरित्या वाचले तर निश्चितपणे यातून प्रगती करायला मदत मिळणार.
वाचण्यापुर्वी लक्षात ठेवण्यासारखी महत्वाची गोष्ट, हे पुस्तक स्वतःच्या वैचारिक प्रगतीसाठी,विकासासाठी, वागणूकी मध्ये बदल घडवुन आणण्यासाठी, नातेसंबंध योग्यरित्या हाताळता यावेत व अशाच इतर गोष्टीं करिता मदत करेल. जर व्यक्तीला वाटत असेल की त्याच्या बाँस, निरिक्षक,सहकारी, सहकर्मचारी,अधीनस्थ, भागीदार, पत्नी, नातेवाईक किंवा इतर कोणाला बदलण्याची आवश्यकता आहे आणि स्वतःला नाही, तर या पुस्तकाला हातात घेऊन स्वतःचा वेळ व्यर्थ वाया घालणे टाळलेले उत्तम.
Good
LikeLike