Homecoming season 1 review – मराठी मध्ये समीक्षा

Homecoming हंगाम १, नोव्हेंबर २०१८ मध्ये अमेझॉन प्राइम वर प्रदर्शित झालेली वेबसिरीज. सरासरी ३० मिनिट लांबीचे १० भाग असणारी रहस्य-गूढ- रोमांचक-नाटकीय शैली असलेली कथा.

वॉल्टर क्रूझ (स्टीफन जेम्स), माझे वैयक्तिक आवडते पात्रे कॉलिन बेलफास्ट (बॉबी कॅनव्वाले) आणि थॉमस कॅरॅस्को (शी व्हिघॅम) यांच्यासोबतच मध्यवर्ती मुख्य भूमिका हायडी बर्गमन जी प्रीटी वूमन ज्युलिया रॉबर्ट्सने साकारलेली आहे, या चार प्रमुख पात्रांभोवती गुंफलेली हि कथा आहे. वॉल्टर क्रूझने निवृत्त तरुण सैनिकाच्या छोट्या भूमिकेत चांगले काम केले. थॉमस कॅरॅस्कोने तपास अधिकाऱ्याच्या भूमिकेमध्ये उत्तम कामगिरी केली. हायडी बर्गमन होमकमिंगच्या केंद्र प्रमुख किंवा पर्यवेक्षक आणि मानसशास्त्रज्ञच्या मुख्य भूमिकेत आहे. प्रीटी वूमनच्या अप्रतिम अभिनयाबद्दल बोलायला शब्दांची आवश्यकता नाही. कॉलिन बेलफास्ट होमकमिंगमध्ये हायडीची भरती करणारा हायडीचा बॉस आणि गाईस्ट (होमकमिंग कार्यक्रम सुरु करणारी किंवा मालकी हक्क असणारी संस्था) च्या समोर येणाऱ्या समस्या/प्रश्नांचे कायदेशीर किंवा बेकायदेशीररित्या निवारण करणाऱ्याच्या नकारात्मक भमिकेमध्ये आहे. कॉलिनने एक शांत,धैर्यवान, कुटील खलनायकाची भूमिका उत्तम साकारली.इतर लहान लहान भूमिकेमध्ये क्रेग (अ‍ॅलेक्स कारपोव्हस्की) होमकमिंग मध्ये हायडीचा सहाय्यक, एलेन बर्गमन (सिसी स्पेस्क) हायडीची आई, ग्लोरिया मॉरिस्यू (मारियान जीन-बॅप्टिस्टे) वॉल्टरची आई, सोबतच अजून काही लहान लहान भूमिका देखील आहेत.

एक रसायन उत्पादक संस्था गाईस्ट द्वारा अमेरिकन निवृत्त तरुण सैनिकांसाठी सुरू करण्यात आलेला ‘होमकमिंग’ हा ६ आठवड्याचा कार्यक्रम कथेच्या केंद्रस्थानी आहे. गोळीबार, रक्तपात, हिंसा, मित्र/सहकारी यांचे डोळ्यासमोर झालेले मृत्यू अशा अनेक वाईट, भयानक, हिंसक आठवणीने युद्धाच्या मोर्चातून सेवा निवृत्त झालेल्या तरुण वयाच्या सैनिकांना सहजरित्या सामाजिक जीवनात वावरता यावे, समाविष्ट होता यावे आणि या भयंकर आठवणींचा त्यांच्या सामाजिक जीवनावर परिणाम न होता त्यांना शांत सुनियोजित जीवन जगात यावे आणि यासाठी सैनिकांना मानसिकरित्या स्थिर करण्यासाठी लागणारी मदत किंवा शिक्षण देणारी संस्था असा प्राथमिक दर्शनी उद्देश्य दाखवून सुरु करण्यात आलेला “होमकमिंग” हा कार्यक्रम. मानसिकरित्या तयार करण्यासाठी आणि वाईट आठवणीमधून बाहेर काढण्यासाठी,निवृत्त सैनिकांना शहराबाहेर सर्वसुखसोयीने समृद्ध, पायाभूत सुविधा सोबतच चैन,ऐषोआरामदायक असलेल्या घरामध्ये, नवीन आयुष्याला आनंदाने, शांतपणे सामोरे जाण्याचे आणि नागरी जीवनाचे धडे देण्यात येतात.हा स्वखुशीने भाग घेण्याचा कार्यक्रम पण एकदा घराच्या परिसरामध्ये प्रवेश केल्यानंतर भाग घेतलेल्या सैनिकांना बाहेर जाण्याची किंवा कुणी आत सैनिकांना भेटायला येण्याची परवानगी नसते.सैनिकांसाठी आतमध्येच अन्न,मनोरंजक खेळ,प्रेरणा देणार सत्र, मानसिक चिकित्सा, मानसशास्त्रीय अभ्यास, नागरीक म्हणून भूमिका बजावणे,समाजात वावरणे, मुलाखत देणे, मित्रांसोबत वागणे, बोलणे आणि इतर आवश्यक सत्र आयोजित केले जातात.या दरम्यान सैनिकांवर, त्यांच्या वागण्यावर वगैरे सतत लक्ष्य ठेवण्यात येते.

वॉल्टर हा स्वत:ला नागरी जीवनाकरिता सक्षम बनवण्यासाठी स्वखुशीने होमकमिंगला येणाऱ्या तरुण सैनिकांपैकी एक असतो जो तिथल्या कार्यक्रमाला सकारात्मक प्रतिसाद देतो आणि सुधारणेचे लक्षण दाखवतो.हायडी त्यांची पर्यवेक्षक व मानसशास्त्रज्ञ म्हणून होमकमिंग मध्ये काम बघते. क्रेग तिथे सैनिकांना सामान्य आयुष्यातील वेगवेगळ्या भूमिका करायला सांगून त्यांचा वागण्याचा, बोलण्याचा, राहण्याचा सराव करून घेतो सोबतच हायडीचा मदतनीस आणि कॉलिनचा होमकमिंग मधील खास माणूस (गुप्तचर) म्हणून काम बघतो. कॉलिन ‘होमकमिंग’ या संकल्पनेचा निर्माता आहे आणि तिथलं सर्व कार्य,लोक, योजनांना नियंत्रित करतो.वॉल्टरच्या आईला होमकमिंगमध्ये सैनिकांना देण्यात येणाऱ्या वागणुकीबद्दल, घडणाऱ्या कार्याबद्दल संशय येतो आणि म्हणून त्या होमकमिंगबद्दल डीओडीकडे तक्रार करतात. थॉमस हा डिओडी मार्फत तक्रारीच्या सत्यतेचा तपास करतो.

होमकमिंगचा मागचा छुपा उद्देश्य काय असतो? निवृत्त तरुण सैनिकांकडून त्यांची काय अपेक्षा असते? गाइस्ट सारख्या रसायन बनवणाऱ्या कंपनीला होमकमिंगसारख्या संकल्पनेमध्ये स्वारस्य का असते? कंपनी त्यात गुंतवणूक का करते आणि कंपनीला त्यातून काय फायदा अपेक्षित असतो? वॉल्टर सोबत नक्की काय घडते, त्याचे परिणाम काय होतात, त्याचा शेवट कसा होतो ? वॉल्टरच्या आईला होमकमिंगबद्दल संशय का वाटतो? हायडीची यासर्वामध्ये काय भूमिका आहे?शेवटी ती वॉल्टर, कॉलिन सोबत काय करते? तिला काय परिणाम भोगावे लागतात? तिला होमकमिंगच्या खऱ्या उद्देश्याबद्दल,वास्तविकतेबद्दल कळते तेव्हा ती काय करते कि तिला आधीपासूनच सर्व माहिती असते? कॉलिन मनोवैज्ञानिक,मानसशास्त्रज्ञ किंवा पर्यवेक्षक म्हणून रिसेप्शनिस्ट हायडीला का घेतो, तिला कसा प्रभावित करतो आणि त्याला हवे तो तिच्याकडून जसे करवून घेतो?कॉलिनचे होमकमिंग,गाइस्ट मधले प्रभुत्व कसे संपते? होमकमिंग मध्ये आलेल्या सैनिकांना कशी वागणूक देण्यात येते? त्यांच्यासोबत तिथे काय घडते? सैनिकांच्या वाईट आठवणी घालवण्यासाठी आणि त्यांना नागरी जीवनासाठी किंवा मुख्य हेतूसाठी कसे तयार करतात आणि यासाठी होमकनिंग कसे काम करते? यामध्ये कोण कोण सामील असते? सरतेशेवटी होमकमिंगचे काय होते? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे थॉमस तक्रारीचा मागोवा कसा घेतो, होमकमिंगमध्ये काय घडले होते हे कसे शोधून काढतो? अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे होमकमिंग हंगाम १ च्या १० भागांमध्ये नक्कीच मिळतिल. 

बौद्धिक-मानसिक-रोमांचक-नाटकीय कथा आवडत असल्यास हि वेब सीरीज अवश्य बघण्यासारखी आहे.कॉलिन आणि थॉमस मुळे कथा खूप रोमांचक आणि मनोरंजक बनली आहे. हायडी ने त्यात भर टाकून ती पाहण्यासारखी आणि पैसा वसूल बनवली आहे.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

One thought on “Homecoming season 1 review – मराठी मध्ये समीक्षा

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started