
रसभरी, 30 मिनिट सरासरी लांबीच्या 8 भागांसह जून २०२० मध्ये अमेझॉन प्राइम वर प्रदर्शित झालेली एक हिंदी वेब मालिका. रहस्य-प्रणय-प्रेम-नाटकीय शैलीवर आधारित असलेल्या कहाणीद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा केलेला एक अयशस्वी प्रयत्न.
कथा दोन पात्रांच्या भोवती गुंफलेली आहे, प्रथम स्वरा भास्करने निभावलेली शानू बन्सल शिक्षिका आणि वेश्या रसभरी अशी दुहेरी भूमिका .स्वरा भास्करचे एकूणच नवीन रूप यात बघायला मिळेल. या दोन्ही भूमिकांमधील अभिनय समाधानकारक किंवा तिच्या पूर्वीच्या भूमिकांच्या तोडीचा नाही आहे.दुसरे पात्र नंद किशोर त्यागी भूमिकेमध्ये आयुष्मान सक्सेना, शानूचा विद्यार्थी. रसभरी बद्दल बातमी कळताच, प्रेमसंबधासाठी शानूला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो. या दोन पात्रासह रश्मी आगडेकर (प्रियंका – नंदची प्रेयसी), प्रद्युमन सिंग (नवीन – शानुचा नवरा) आणि नीलू कोहली (पुष्पा – नंद ची आई) यांच्या पण मुख्य भूमिका आहेत. या व्यतिरिक्त लहान लहान भूमिकेमध्ये नंदचे दोन मित्र, नंदचे वडील, पप्पू केबलवाला, पुष्पाच्या ५-६ ते मैत्रिणी, प्रियांकाच्या दोन मैत्रिणी, शानू आणि नवीनचे आई-वडील, पानवाला असे वेगवेगळे अभिनेते आहेत. स्वरा वगळता प्रत्येकाने चांगला अभिनय केला आहे. शीर्षक भूमिकेमुळे असलेले जास्त अपेक्षेचं ओझे ती पेलू शकली नाही सोबतच शानूसाठी वापरलेली बोलण्याची लकब थोडी त्रासदायक किंवा चिडचिड करवणारी आहे. पुष्पा आणि तिच्या मैत्रिणी यांचे पात्र विनोदी आहे आणि मध्ये मध्ये हसवत राहतात.
मेरठ शहरात नौकरी साठी आलेल्या शानू, भूतानी पछाडलेली किंवा एकाधिक व्यक्तिमत्त्वाच्या विकृतीने ग्रासलेली (आपण त्याला काय समजतो हे आपल्यावर अवलंबून आहे) हा मूलाधार असलेली कथा. शानू अचानक रसभरी मध्ये परिवर्तित होते आणि वेगवेगळ्या पुरुषांशी प्रणय किंवा प्रेमसंबंध प्रस्थापित करते.ही अफवा/सत्य बातमी आगीसारखी सर्व शहरात पसरते आणि शहरातील पुरुष तिच्या मागे पागल होतात.नंद रसभरी सोबत प्रणय करण्याचा विचार करतो आणि तशी संधी मिळवण्यासाठी,तो शानू कडे इंग्रजीची शिकवणी लावतो. शानूच्या नवऱ्याला तिच्या या विकृती / पछाडण्या बद्दल माहित असते आणि तो नंदला तिच्या भूतकाळाबद्दल सर्व काही सविस्तर सांगतो.सत्य कळल्यानंतर नंद यामागचं गूढ शोधण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान शानू त्याला इंग्रजी सोबतच शिष्टाचार,आदर करणे पण शिकवते. त्यामुळे जेव्हा संधी मिळते तेव्हा शानूबद्दलचा आदर आणि प्रियंकावरील प्रेमामुळे तो रसभरी सोबत काही करू शकत नाही किंवा करत नाही. पुष्पा आणि शहरातील अन्य स्त्रियांनी, शानूची धींड काढून शहराबाहेर हाकलून लावण्याच्या केलेल्या कटापासून नंद त्यांना वाचवतो आणि सुरक्षित शहराबाहेर पाठवतो.शेवटी शानू/ रसभरी बद्दल उत्तरे मिळतात पण ते अधिक जास्त बुचकळ्यात टाकून गोंधळ निर्माण करतात.नवीन गोड छोट्या आश्चर्यांसह केलेल्या शेवटामुळे आणि अन्य काही अनुत्तरित राहलेले किंवा ठेवलेले मुद्दे कदाचित पुढच्या सीजनसाठी तयार केलेला मंच असू शकते.
दिग्दर्शक आणि निर्मात्याने प्रणय, प्रेमसंबंध आणि विवाद, वादंगातून (विविध कारणांमुळे चर्चेत असलेल्या व्यक्तीला मुख्य भूमिका देवुन) प्रसिद्धी, प्रेक्षक मिळवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु ते पूर्णपणे अयशस्वी ठरले. काही दृश्य तुम्हाला एकदमच कथेशी अप्रासंगिक/असंबद्ध वाटतील.
एखाद्या उत्पादनाची प्रक्षेपण करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे आणि उत्पादन तयार नाही. म्हणून मग उत्पादनामध्ये (रसभरी) किती समस्या अथवा दोष आहेत याचा फरक पडत नाही आणि ठरलेल्या तारखेआधीच हे उत्पादन प्रक्षेपित करून व्यवस्थापक मंडळाला (अॅमेझॉन) आनंदी केले जाते परंतु उपभोक्त्याला यामुळे त्रास होणार याचा काही विचार केला जात नाही. ही मालिका याचा जिवंत उदाहरण आहे.
तुमच्याकडे भरपूर वेळ आहे आणि काहीच म्हणजे काहीच (झोप पण) करण्यासारखे, बघण्यासारखे नाही तेव्हाच बघण्याची जोखीम आपण स्वबळावर पत्करू शकता.
Mast review
LikeLike