Homecoming season 2 review – मराठी मध्ये समीक्षा

होमकमिंग सीजन २, सरासरी ३० मिनिट लांबीच्या ७ भागासह जून २०२० मध्ये अमेझॉन प्राईम वर प्रदर्शित झालेली रोमांचक-नाटकीय-गुढ-हेरगिरी धाटणीची कथा असलेली वेब मालिका.

कथा प्रामुख्याने ४ पात्रांभोवती गुंफलेली आहे. पहिले पात्र सीजन १ मधीलच वॉल्टर क्रूझ (स्टीफन जेम्स) निवृत्त तरुण सैनिक,ज्याच्यावर होमकमिंगमध्ये उपचार झाला आहे आणि आता विशिष्ट घटनांशी संबंधित गोष्टी आठवत नसल्यामुळे गोंधळलेला आहे. ऑड्रे टेंपल (हाँग चाऊ), गाइस्ट कंपनीमध्ये रॉन आणि कॉलिनला काढुन टाकल्यावर, त्यांच्या पदावर नियुक्त होणारी रिसेप्शनिस्ट महिला. गाइस्ट कंपनीचे मालक लिओनार्डो गाइस्ट (ख्रिस कुपर). मुख्य आणि महत्वाच्या भुमिकेमध्ये अ‍ॅलेक्स किंवा जॅकी (जेनेल मोनी), व्यवसायाने मुख्यतः संकट व्यवस्थापक आणि ऑड्रेची मैत्रीण किंवा प्रेयसी. यांच्यासोबत अन्य लहान लहान पण महत्त्वपूर्ण भुमिकांमध्ये आहे क्रेग (अ‍ॅलेक्स कार्पोव्हस्की) गाइस्टचा कर्मचारी आणि ऑड्रेचा सहाय्यक; फ्रान्सिन बुंडा (जोन क्युसॅक) डीओडीमध्ये उच्चं पदावर आरूढ महिला अधिकारी; लेन (टायलर रिटर); वेंडी (मेरी हॉलंड); चड (जिमी बेलिंगर), काइल (ख्रिस्तोफर रेडमन); डॉ. जमानी (जॉनी स्नीड); ऑफिसर डोना (ऑड्रे वासिलीवस्की) इ.आणि सीजन १ मधील मुख्य खलनायक कॉलिन बेलफास्ट (बॉबी कॅनव्वाल) खुपच छोटाश्या पाहुण्या भुमिकेत आहे. प्रत्येकाने वेब सिरीजला मनोरंजक आणि रोमांचक बनवण्यासाठी उत्कृष्ट काम केले आहे आणि यशस्वी पण झाले आहेत.

निर्जन स्थळी असलेल्या तलावात तरंगणाऱ्या एका होडीमध्ये जॅकी शुद्धीवर येते,अशी वेब मालिकेची सुरुवात होते. शुद्धीवर आलेली जॅकी स्वतःची ओळख आणि भुतकाळ विसरलेली असते. तिला त्याबद्दल काहीच आठवत नसते. किनाऱ्यावर तिच्याकडेच बघत उभ्या असलेल्या व्यक्तीला मदतीसाठी हाक मारते, तर तो मदत न करता तेथुन पळ काढतो. प्रयत्न करून ती किनारा गाठते, तिला तिथे एका गाडीची चावी मिळते. रस्त्यावर गोंधळलेल्या जॅकीला फिरताना बघुन पोलीस तिची चौकशी करतात आणि तपासणीसाठी रूग्णालयात घेऊन जातात. तिथुन ती एका वृद्ध व्यक्तीसह फरार होते आणि जवळच्या हॉटेल मध्ये विश्रांतीसाठी थांबते. याच हॉटेलमध्ये आधल्या रात्री ती एका पुरुषाबरोबर आली होती असे तिला तिथे कळते.माहिती काढुन ती त्या पुरुषाच्या खोलीमध्ये घुसते. तिथे तिला लष्करी अधिकाऱ्यांच्या समुहाचे एक छायाचित्र मिळते, ज्यात ती पण असते. त्यावरून तिला वाटते ती एक सेवानिवृत्त लष्करी अधिकारी आहे.परंतु तिच्या हातावर बनलेला लष्करी तुकडीचा टॅटू बनावटी आहे हे पण लक्षात येते आणि ती बुचकळ्यात पडते.

सोबत असलेला वृद्ध व्यक्ती तिचा डोक्यावर वार करून पैसे घेऊन निघुन जातो. शुद्धीवर आल्यानंतर तिला लक्षात येते की मिळालेली चावी, पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीची आहे. गाडीमध्ये तिला गाइस्ट कंपनीचा लिफाफा आणि एक नळी मिळते. या माहितीच्या आधारे ती गाइस्ट कंपनीमध्ये आणि नंतर ऑड्रेच्या कॅबिनमध्ये पोहोचते, तिथे स्वतःचे छायाचित्र बघुन तिला आश्चर्याचा धक्का बसतो. तेव्हाच गाइस्ट कंपनीमध्ये पार्टी सुरू असते आणि कंपनीचा मालक लिओनार्डो गाइस्ट लोकांना संबोधित करत असतो, परंतु झालेल्याअचानक मोठया आवाजामुळे त्याचे संबोधन थांबते आणि एकच गडबड गोंधळ होते. या गोंधळा दरम्यान ऑड्रे आणि जॅकीची नजरानजर होते. त्या एकमेकींना भेटतात तत्क्षणी कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते.

हायडी (सीजन १ ची नायिका) एका रेस्टॉरंटमध्ये वॉल्टरला भेटते, तो तिला ओळखत नाही किंवा तिच्याबद्दल त्याला काही आठवत पण नाही.तसेच, डीओडी कार्यालयातील एक महिला अधिकारी गाइस्ट कंपनी मध्ये फोन करून कंपनीच्या होमकमिंग प्रकल्पाची डीओडीमार्फत होणाऱ्या अधिकृत तपासणीबद्दल सुचित करते. याप्रकारे होमकमिंग सीजन १ चा शेवट करण्यात आला होता.

फ्लॅशबॅकमध्ये वॉल्टरची कथा त्याच रेस्टॉरंटच्या बाहेरून सुरु होते. घरी परत जातांना विचारमग्न वॉल्टरच्या गाडीचा अपघात होतो. रुग्णालय भेटीदरम्यान तो डॉक्टरांना सांगतो की त्याच्या डोक्यावर आधी एक शस्त्रक्रिया झाली आहे.परंतु डॉक्टरांना त्याच्या डोक्यावर शस्त्रक्रिया झाल्याचे कुठलेही निशाण आढळत नाही.याबद्दल स्पष्टीकरण मिळवण्यासाठी तो निवृत्त सैनिक सहाय्यक कार्यालयात जातो. कार्यालयात त्याला सांगण्यात येते कि त्याच्यावर कुठलेही  शस्त्रक्रिया झाली आहे अशी माहिती तिथे उपलब्ध नाही. परंतु गाइस्ट या तृतीय-पक्ष कंत्राटदार कंपनीच्या होमिकमिंग केंद्रामध्ये वॉल्टरवर उपचार करण्यात आले होते आणि त्या उपचाराचा तपशील कार्यालयात उपलब्ध नाही. गाइस्ट कंपनीला मेल केल्यानंतर १२ आठवड्यांनी माहिती मिळेल. चिडलेला वॉल्टर त्या कार्यालयात गोंधळ करतो, म्हणुन पोलिस त्याला अटक करतात. अ‍ॅलेक्स, एका सामाजिक संस्थेची प्रतिनिधी बनुन त्याला सोडवण्यासाठी तिथे येते आणि त्याचा जामीन घेऊन त्याला सोडवते.

गाइस्ट कंपनीची होमकमिंग बद्दल तपासणी आणि चौकशी होणार ही माहिती देण्यासाठी डीओडी कार्यालयातील महिला अधिकाऱ्यानी केलेला फोन, गाइस्ट कंपनी मध्ये ऑड्रे उचलते. या संधीचा वापर करत ती कॉलिनला जाळ्यात अडकवते. कॉलिनला, होमकमिंग आणि तिथल्या संपुर्ण कार्याची जबाबदारी स्वीकारण्यास भाग पाडुन, त्यात कंपनीची कोणतीही भुमिका नाही असे त्याच्याकडुन जबरदस्तीने लिहुन घेते. अशाप्रकारे ती कंपनीला होमकमिंगच्या चौकशी मधुन वाचवते आणि कंपनीचे मालक लिओनार्डो गाइस्ट यांना तशी माहिती देते.

कॉलिन आणि रॉनने गाइस्ट कंपनी द्वारे होमकमिंग नावाचा एक कार्यक्रम चालविला होता याबद्दल लिओनार्डो पुर्णपणे अजाण किंवा अनभिज्ञ असतो. तो कॉलिन आणि रॉनला लगेच कंपनीमधुन काढुन टाकतो आणि ऑड्रेला बढती देऊन रॉनच्या जागी तिची नियुक्ती करतो. लिओनार्डोला होमकमिंग कार्यक्रमाअंतर्गत निवृत्त तरुण सैनिकांवर अन्नाद्वारे करण्यात येणाऱ्या औषधोपचाराच्या प्रयोगाबद्दल माहिती मिळते. हे औषध गाइस्ट कंपनीच्या शेतामध्ये उत्पादित होणाऱ्या एका विशेष बेरीज पासून तयार केलेला अर्क असतो.त्याला याचा वाईट परिणाम लक्षात येतो म्हणून या बेरीज नष्ट करण्याचा आणि अर्काचे उत्पादन थांबवण्याचा विचार करतो.

पण ऑड्रे जेव्हा चौकशीसाठी डीओडीला जाते तेव्हा तिला तिथे बुंडा भेटते. बुंडा गाइस्ट कंपनीच्या होमकमिंग कार्यक्रमानी प्रभावित असते आणि त्याला आपला पाठिंबा दर्शवते. ती होमकमिंग मध्ये उपचारासाठी औषधाच्या वापरला सकारात्मकतेने घेते आणि गाइस्ट कंपनीला निर्दोष जाहीर करत त्यांच्यावरील आरोप फेटाळुन लावते. बुंडाला बेरीज डीओडीची मालमत्ता म्हणून जतन करायची इच्छा असते आणि सोबतच बेरीजचा अर्क जागतिक स्तरावर विकायच्या विचारात ती असते. त्यासाठी ती ऑड्रेला गाइस्ट कंपनीमध्ये एक मोठी पार्टी पण आयोजित करायला सांगते.

या सर्व खेळात अ‍ॅलेक्स/ जॅकीची मुख्य भूमिका का व कशी आहे? कॉलिन आणि रॉनला फसवुन ऑड्रे कशी त्यांची जागा घेते? रिसेप्शनिस्ट ऑड्रेला, रॉनची जागा घेण्यास कोण मदत करते? ऑड्रे आणि अ‍ॅलेक्स / जॅकीचा काय संबंध असतो? अ‍ॅलेक्स, ऑड्रेसाठी काय करते आणि कुठल्या थराला जाते? अ‍लेक्स खरंच काय व्यवसाय करते? वॉल्टरच्या अटकेबद्दल अ‍लेक्सला कसे कळते? ती त्याचा जामीन घेऊन त्याला का सोडवते? ती आपला भुतकाळ, ओळख, आठवणी का गमावते? एकांतात निर्जण तलावामधील नावेत ती कशी पोहचते आणि का बेहोश होते? मदतीच्या हाकेनंतर किनाऱ्यावरून पळुन गेलेला व्यक्ती कोण असतो आणि का पळुन जातो ? जॅकी/अ‍ॅलेक्स गाइस्ट कंपनीच्या परिसरामध्ये सुरु असलेल्या पार्टीमध्ये कशी पोहोचते? वॉल्टरला तृतीय-पक्ष कंत्राटदाराकडुन उपचारांबद्दल काय माहिती मिळते? ऑड्रेला गाइस्ट कंपनी वाचविण्यात बुंडा कशी आणि का मदत करते? बुंडाला बेरीज का हव्या असतात? लिओनार्डो बेरीज अपव्यय न करता, जतन करण्यास का तयार होतो ? ऑड्रे बेरीजचा अर्क डीओडीला विकण्यासाठी लिओनार्डोला कशी राजी करते? अखेरीस, लिओनार्डो बेरीज चुकीच्या हातात जाण्यापासुन किंवा चुकीचा वापर होण्यापासुन वाचवतो का? त्याला कोण मदत करते? ऑड्रे आणि बुंडाला बेरीज आणि अर्कचा ताबा घेण्यापासुन लिओनार्डो थांबवु शकला का? अ‍ॅलेक्सला तिची ओळख आणि भुतकाळातील आठवणी परत मिळतात का ? बेरीजचे काय होते ? ह्या सर्व गोंधळाचा शेवट सकारात्मक होतो की नकारात्मक होतो ? या सर्व प्रश्नांची उत्तरे होमकमिंग सीजन २ च्या ७ भागांमध्ये हळु हळु उलगडली जातात.

प्रथम दीड भाग असंबंधित, रटाळ आणि गुरफटलेला वाटू शकतो. परंतु पुढे  पुढे कथा मनोरंजक आणि रोमांचक होत जाऊन उत्सुकता आणि रुची निर्माण करते आणि हळु हळु पहिल्या भागासोबत कथेचे धागे जुळत जातात. रहस्य-गुढ-नाटकीय शैली आवडत असेल तर ही वेब मालिका अवश्य बघण्यासारखी आहे. ऑड्रे, अलेक्स, लिओनार्डो आणि वॉल्टर यांच्या उत्तम अभिनयाने मालिकेला मनोरंजक आणि रोमांचक बनवले आहे.

Published by Chetan Nikam

Father of Cute, Sweet, Lovely Daughter who makes me to forgot all my worries, trouble and tension by single word "BABA". Engineer by profession

One thought on “Homecoming season 2 review – मराठी मध्ये समीक्षा

Leave a reply to Sandip Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started